Pune : 'इंडिगो'च्या विमानाचे आपत्कालिन लँडिंग

पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी पुणे विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on: 

पुणे : पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी पुणे विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) याबाबत माहिती दिल्यानंतर विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या. अखेर सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. या विमानातील १९२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E 0623 (VT-IZE) हे विमान पुण्याहून गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर लँडिंग गियर आत न गेल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विमानाने एटीसीशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाची माहिती दिली.

विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. दरम्यान, प्रवाशांचा पुढील गुवाहाटी प्रवास खोळंबू नये, यासाठी इंडिगोकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)