पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीला चौदा दिवस (५ मेपर्यंत) बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळानं त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.
दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. मंडळाच्या प्रधान न्यायाधीश एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला. त्याचवेळी आरोपीला सज्ञान घोषित करून खटला चालवावा यासंदर्भातील युक्तिवादही सरकारी वकिलांकडून करण्यात आला. मात्र याचा निर्णय घ्यायला किमान १ महिना ते ३ महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे बाल न्याय मंडळाने सुनावणी अखेर स्पष्ट केले.
वडिलांना पोलीस कोठडी, मुलाचा जामीनही रद्द-
पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टानं त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशाल अग्रवालला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यानंतर सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. तपासासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली, परंतू कोर्टाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?-
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलानं दारू पिऊन बेदरकारपणे आलीशान पोर्श गाडी चालवत समोरील दुचाकीवरील दोघांना उडवले होते. १७ वर्षांच्या तरुणाने चालवलेल्या लक्झरी पोर्शने एका मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता.