संबंधितांना ४२ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार! महसूल मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण: कोरेगाव पार्क जमीन प्रकरण

हा विषय मी तपासला आहे. तपासणी केल्यावर लक्षात आले की, नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हा व्यवहार तपासून योग्य ती कारवाई केली आहे. व्यवहाराची मूळ रक्कम ३०० कोटी रुपये दाखवण्यात आली होती. त्यावर...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार सरकारी मालमत्तेशी संबंधित असल्याने तो तांत्रिकदृष्ट्या रद्द करावा लागेल, मात्र हा व्यवहार रद्द करताना संबंधितांना एकूण ४२ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

हा विषय मी तपासला आहे. तपासणी केल्यावर लक्षात आले की, नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हा व्यवहार तपासून योग्य ती कारवाई केली आहे. व्यवहाराची मूळ रक्कम ३०० कोटी रुपये दाखवण्यात आली होती. त्यावर २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आली. आता हा व्यवहार रद्द करण्यासाठी ‘रीकन्वेअन्स’ करताना अजून २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल. म्हणजेच एकूण ४२ कोटी रुपये भरावे लागतील, असे विभागाने स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा व्यवहार तांत्रिकदृष्ट्या चुकीचा झाला आहे. सरकारी जमीन परस्पर विकण्यात आली आहे. त्यामुळे तो खोटा व्यवहार ठरतो. सरकारकडे ती जमीन परत घ्यावी लागेल. मात्र, ज्या रकमेवर व्यवहार दाखवला आहे त्यावर मुद्रांक शुल्क आकारणे हे मुद्रांक अधिनियमातील नियमांप्रमाणे बंधनकारक आहे. कारण केंद्राच्या मुद्रांक कायद्यानुसार व्यवहाराच्या मूल्यावर आधारित शुल्क आकारले जाते. ‘टायटल’ला यात अर्थ नाही; व्यवहार मुद्रांक अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा दाखवलेली रक्कम महत्त्वाची असते, असे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विभागाने काढलेली नोटीस पूर्णतः नियमांनुसार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

“आमची समिती या संपूर्ण व्यवहाराचा अहवाल तयार करत आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.” असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in