

पुणे : राज्याच्या विविध भागात सध्या बिबट्यांची दहशत सुरू आहे. या बिबट्यांमुळे अनेकांच्या प्राणावर बेतले जात आहे. त्यातच आता बिबट्यांमुळे तरुणांच्या विवाह योगातही विघ्न येऊ लागले आहे. बिबट्याची दहशत असलेल्या गावांमध्ये मुली देण्यास मुलींचे पालक नकार देत आहेत. त्यामुळे शेकडो विवाहेच्छुक तरुणांची लग्ने रखडली आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावात सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्या अचानक येऊन प्राण्यांसह माणसांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या कधीही येऊन आपला फडशा पाडेल, अशी घबराट गावकऱ्यांमध्ये आहे.
माणसांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या लग्नातही मोठा अडथळा ठरत आहे. बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांत एकाही मुलाची सोयरिक जमेनाशी झाली आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्याने गावांतील अनेक तरुण हवालदिल झाले आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे कोणतेच पालक या गावात आपल्या मुली द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अनेकांची लग्न रखडली आहेत.
मुले चांगल्या घरातील असूनही त्यांना लग्नासाठी होकार मिळत नाही, अशी सध्या स्थिती आहे. गावात आणि आसपासच्या भागात बिबट्याची दहशत असल्यामुळे कोणतेच पालक या गावांमधील तरूणांशी आपल्या मुलीचे नाते जोडण्यास तयार नाहीत. मुलीही या गावांत येण्यास आणि जीव धोक्यात घालण्यास नकार देत आहेत. बिबट्यांच्या धाकाने गावांतील सामाजिक वातावरणही ढवळून निघाले आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे विवाहसंबंधांवर परिणाम होणे हे ग्रामीण भागातील नवे आणि चिंताजनक वास्तव ठरत असून बिबट्यांचा लवकरच बंदोबस्त करून लग्न जुळण्यातील अडथळे दूर करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत बिबट्यांमुळे भयावह परिस्थिती तयार झाली आहे. लोकांच्या, जनावरांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या कधी भरवस्तीत घुसून तर कधी शेतातील लोकांना पकडून, कधी गोठ्यातील गुरांचे नरडे पकडून त्यांना ठार मारून घेऊन जातो. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून जगायची वेळ आली आहे.
सुरक्षेसाठी गावकऱ्यांकडून विविध उपाययोजना
दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना गावकरी करत आहेत. बिबट्या नरडीचा घोट घेत असल्याने काही गावांतील महिला सुरक्षेचा उपाय म्हणून गळ्यात खिळे असलेला पट्टा धारण करीत आहेत. सध्या बिबट्याची दहशत केवळ जीवघेणीच ठरत नाही, तर विवाहांमध्येही बाधा येऊ लागल्याने नवी सामाजिक समस्याही निर्माण झालेली दिसत आहे.