पुणे लोकसभा मतदारसंघ; आता होणार तिरंगी लढत

पुण्यात सुरुवातीला रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये तगडी लढत होणार होती मात्र आता वसंत मोरे हे वंचितकडून मैदानात उतरल्याने ही लढत तिहेरी होणार आहे. तिघेही पुण्याचे तगडे उमेदवार आहेत.
 पुणे लोकसभा मतदारसंघ; आता होणार तिरंगी लढत

पुणे : वंचित बहुजन आघाडीची पुणे लोकसभा मतदार संघामध्ये मनसेला रामराम केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी ही तिरंगी लढत होणार आहे.

पुण्यात सुरुवातीला रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये तगडी लढत होणार होती मात्र आता वसंत मोरे हे वंचितकडून मैदानात उतरल्याने ही लढत तिहेरी होणार आहे. तिघेही पुण्याचे तगडे उमेदवार आहेत. तिघांचाही दांडगा संपर्क आहे. कोरोना काळात तिघांनीदेखील जनतेची कामं केली आहेत. आता पुणेकर नेमकी कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला राजीनामा देऊन २० दिवस उलटले आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याच्या भेटी घेतल्या. मात्र पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीने काँग्रेससाठी सोडली होती. त्यामुळे वसंत मोरे ऐवजी काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची चर्चा सुरु झाली.

मराठा आंदोलन समितीच्या बैठकीतही मोरेंची उपस्थिती दिसली होती. त्यावरुनही मराठा आंदोलन समितीकडून लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या. या दरम्यान मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर वंचितकडून वसंत मोरे यांची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर आता वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आयुष्यात कधी नुरा कुस्ती केली नाही - वसंत मोरे

वसंत मोरे म्हणाले, आयुष्यात कधी नुरा कुस्ती केली नाही आणि वसंत मोरे चीतपटच मारणार आहे. मी शंभर टक्के मी निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्यांनी देशाचं वाटोळं केलं त्या भारतीय जनता पक्षाविरोधात ही निवडणूक असणार आहे. वसंत मोरे यांनी या लढतीच्या निमित्ताने सांगितले की, मला उमेदवारी मिळावी याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो. पण मला काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईन. मागील २५ वर्षांपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत राहिलो. त्या कालावधीत पुणे महापालिकेमध्ये ३ वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. या १५ वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात सत्तेमध्ये नसताना देखील कात्रज प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. कात्रज प्रभाग हा शहरासमोर रोलमॉडेल ठरलं आहे. माझ्याकडून प्रभागात सर्व विकासकामं सुरू होती, असेही वसंत मोरे म्हणाले.

मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोघांसोबत मी पुणे महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. ते दोघे पण माझे चांगले मित्र आहेत. तसेच मी या निवडणुकीत वैयक्तिक टीका करणार नाही. तर त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात सातत्याने भूमिका मांडत राहणार, त्याचबरोबर आजवरचं माझं काम पाहून पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील, असा विश्वासही यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in