Pune : कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीती

पुणे उद्योगनगरीतील मोशी येथील कचरा डेपोमधील कचऱ्याचा अवाढव्य डोंगर जवळच असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही दुमजली आरसीसी इमारत खचली.
Pune : कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीती
Pune : कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ ते २० कर्मचारी अडकल्याची भीतीX | ANI
Published on

पुणे: उद्योगनगरीतील मोशी येथील कचरा डेपोमधील कचऱ्याचा अवाढव्य डोंगर जवळच असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही दुमजली आरसीसी इमारत खचली. या दुर्घटनेत सुमारे १५ ते २० कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून, यातील चौघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत सुमारे ५०० ते ६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा ढीग अस्थिर झाला आणि तो साधारण ३० मीटर अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. ही दुर्घटना घडली, तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे अनेक कर्मचारी इमारतीमधील कॅन्टीनमध्ये आणि कार्यालयात उपस्थित होते. इमारतीचा पाया खचल्याने खालच्या मजल्यावर असलेले १५ कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले, तर वरच्या मजल्यावरील ४ ते ५ जण नशिब बलवत्तर म्हणून सुरक्षितपणे बाहेर पडले.

मदतकार्य सुरू; लष्कराला पाचारण

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे गांभीर्य आणि ढिगाऱ्याचे प्रचंड प्रमाण लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तर लष्कराची तुकडीही मदतीसाठी तातडीने दाखल झाली आहे.

सध्या बचाव कार्यात कचऱ्याचा मोठा ढिगारा ही मुख्य अडचण ठरत आहे. इमारतीवर साचलेला हा कचरा वेगाने बाजूला केल्याशिवाय अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तीन जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांशी सातत्याने संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

अडकलेल्यांशी संपर्क

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुमारे १५ ते १६ कर्मचाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित झाला असून त्यांचे आवाज ऐकू येत आहेत. हे कर्मचारी जीवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने बचाव पथकांचा हुरूप वाढला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in