अखेर विवेक भीमनवार रजेवर; पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाला यश, सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची घोषणा

आंदोलनामुळे दबावात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जात असल्याचे ट्विट रविवारी मध्यरात्री केल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
अखेर विवेक भीमनवार रजेवर; पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाला यश, पेपरफुटी प्रकरणांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची घोषणा
अखेर विवेक भीमनवार रजेवर; पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाला यश, पेपरफुटी प्रकरणांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची घोषणा
Published on: 

मुंबई/पुणे : पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ११ दिवसांच्या ऐतिहासिक आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, राज्य सरकारने २०२१ पासूनच्या सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे दबावात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जात असल्याचे ट्विट रविवारी मध्यरात्री केल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

‘एमपीएससी’ भरती परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि कारभारातील अनियमिततेच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती रविवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून जाहीर केली.

पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्याची घोषणा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. एवढेच नव्हे, तर या समितीच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले, तर सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक, ज्येष्ठ पोलीस अधिकारी लखमी गौतम आणि सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.हा आयोग येत्या दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

रोहित पवार, विश्वजित कदम यांनी दिले बळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विद्यार्थी आंदोलनाला बळ दिले होते. याशिवाय विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर भीमनवार यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आल्याचे समजते. या घडामोडीनंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व १४ मागण्या मान्य

गेल्या ११ दिवसांपासून पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महात्मा गांधींच्या ‘सत्याग्रह’ मार्गाने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्वच्या सर्व १४ प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in