पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा – सपकाळ

मुंबई, पुण्यासह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुतीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता, त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघडकीस येत असून, कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली, त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले. त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला. दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला, असे सांगितले जात आहे. म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत, मग कारवाई का करत नाहीत ? एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने याआधी पुण्याच्या बोपोडीतील अॅग्रिकल्चर डेअरीची सरकारी जमीन बोगस कागदपत्रे तयार करून हडपली. या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले, तर ते एका साखर कारखान्यातून आले. हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे."

"भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती, तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला हे जाहीर करण्यात आले. पण हे प्रकरण संपलेले नाही. या प्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर काय करवाई झाली ? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपाच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहित कंभोजला एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे, यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे," असे सपकाळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in