Mundhwa Land Scam : प्रमुख आरोपी शीतल तेजवानी भारतातच; अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या संपर्कात असल्याचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील मुंढवा भागातील जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही, मात्र ती देशाबाहेर पळून गेली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास चुकीचा ठरला आहे.
Mundhwa Land Scam : प्रमुख आरोपी शीतल तेजवानी भारतातच; अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या संपर्कात असल्याचा दावा
Published on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील मुंढवा भागातील जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही, मात्र ती देशाबाहेर पळून गेली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास चुकीचा ठरला आहे. शीतल तेजवानी सध्या भारतातच असून ती आपल्या वकिलांच्या संपर्कात आहे, हे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बावधन पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.

शीतल तेजवानी भारतामध्येच आहे, हे सिद्ध करणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिने दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर तिची सही आहे, ज्यामुळे ती इथेच असल्याचे स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर, ज्या अमेडिया कंपनीसोबत तिचा व्यवहार झाला होता, त्या कंपनीच्याही ती संपर्कात आहे. कारण दोघांनी मिळून वकिलांच्या मार्फत हा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. वकिलांच्या संपर्कात राहून, व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असतानाही पोलिसांना ती का नाही? पोलिसांना तिला पकडायचेच नाहीये का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सूत्रांनुसार, जर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, तर अटकेची एक साखळी पुढे निर्माण होऊ शकते. या दोन जमिनींच्या घोटाळ्यांमध्ये एकूण नऊ आरोपी आहेत. जर एका आरोपीला अटक झाली, तर इतर आठ आरोपींना अटक का झाली नाही, असा प्रश्न निर्माण होईल.त्यामुळे, सध्या जे सुरू आहे, त्यावरून हे दिसून येते की पोलीस या आरोपींना अटक करणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in