Pune : आरक्षण सोडतीने दिग्गजांचे राजकीय गणित कोलमडले; प्रभाग रचनेतूनच काहींचा ‘पत्ता कट’

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीतून उद्भवलेल्या आरक्षण फेरबदलामुळे शहरातील अनेक दिग्गज नेत्यांचे असून काही अनुभवी नगरसेवक, माजी महापौर आणि माजी पदाधिकारी अडचणीत आले आहेत. अनेकांना सर्वसाधारण गटातून पुनर्लढतीसाठी उतरण्याची वेळ आली आहे.
PMC Pune Corporation
Published on

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीतून उद्भवलेल्या आरक्षण फेरबदलामुळे शहरातील अनेक दिग्गज नेत्यांचे असून काही अनुभवी नगरसेवक, माजी महापौर आणि माजी पदाधिकारी अडचणीत आले आहेत. अनेकांना सर्वसाधारण गटातून पुनर्लढतीसाठी उतरण्याची वेळ आली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या ३४,८१,३५९ असून अनुसूचित जाती ४,६८,६३३ आणि अनुसूचित जमाती ४०,६८७ इतकी आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४१ प्रभाग असून ४० प्रभाग चार-सदस्यीय तर प्रभाग क्र. ३८ पाच-सदस्यीय आहे.

आरक्षण फेरबदलामुळे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे आणि प्रकाश कदम यांना यंदा सर्वसाधारण गटातून उमेदवारी घ्यावी लागणार आहे.

तीन माजी उपमहापौर आणि दोन माजी महापौर सभागृहाबाहेर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सरस्वती शेंडगे आणि सुनीता वाडेकर यांच्या प्रभागांतील जागा महिला किंवा सर्वसाधारण गटासाठी खुल्या झाल्याने त्यांची पुनर्लढतीची शक्यता कमी झाली आहे. २०१७ नंतर महापौर राहिलेल्या मुक्ता टिळक यांचे निधन झाले असून मुरलीधर मोहोळ सध्या खासदार व केंद्रीय मंत्री असल्याने तेही सभागृहात दिसणार नाहीत.प्रभाग रचना व आरक्षणामुळे डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, सरस्वती शेंडगे, अविनाश बागवे, आबा बागुल, श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले आणि मनिषा लडकत अडचणीत आले आहेत.

एकूण आरक्षण संख्येचा तपशील

एसटी - २ (१ महिला)

एससी - २२ (११ महिला)

ओबीसी - ४४ (२२ महिला)

सर्वसाधारण - ९७ (४९ महिला)

प्रभाग ३८ मध्ये दिग्गजांची थेट टक्कर

पाच-सदस्यीय प्रभाग क्रमांक ३८ मध्ये दत्ता धनकवडे, वसंत मोरे, प्रकाश कदम आणि युवराज बेलदरे यांच्यात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. महिलांमध्येही स्मिता कोंढरे, राणी भोसले, मनिषा कदम इत्यादींमध्ये तीन जागांसाठी चुरस अपेक्षित आहे.

राजकीय समीकरणांचे पुनर्मूल्यांकन

आरक्षण सोडतीनंतर शहरातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आता युती-आघाड्यांच्या चर्चेकडे वळले आहे. कोणत्या पक्षाला आरक्षण फेरीत फटका बसतो आणि कोण नवीन चेहरे पुढे आणतो, यावर आगामी निवडणूक रणनीती ठरणार आहे.

पाच आमदारांचे महापालिकेत पुनरागमन नाही

विधानसभा निवडणुकीत निवडून गेलेले सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे आणि हेमंत रासने हे आता एमएलए झाल्यामुळे महापालिकेच्या राजकारणापासून दूर राहतील.

धंगेकर-बिडकर सामना रद्द

२०१७ मधील चर्चित धंगेकर विरुद्ध बिडकर सामना यावेळी होणार नाही. प्रभाग २४ मध्ये ओबीसी महिला आरक्षण असल्याने धंगेकर यांच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर बिडकर सर्वसाधारण गटातून लढणार आहेत. पल्लवी जावळे आणि राहुल भंडारे यांचे प्रभाग नव्या रचनेतून पूर्णपणे गायब झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in