

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मतदारयादीतून नावे गायब होणे, ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, बोगस मतदान तसेच शाई पुसून पुन्हा मतदान केल्याचे आरोप अशा अनेक धक्कादायक प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. किरकोळ हाणामारीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया मात्र शांततेत पार पडली.
पुणे महापालिकेतील ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. मात्र प्रारंभीच्या टप्प्यातच अनेक मतदान केंद्रांवर अडचणी निर्माण झाल्या. शहरातील विविध भागांत ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. प्रभाग क्रमांक २६ मध्ये दोन खोल्यांमधील मतदान यंत्रे बंद असल्याने मतदान प्रक्रिया तब्बल एक तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे मतदारांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली.
पुण्यातील आकडेवारी
७.३० ते ११.३० पर्यंत = १२%
७.३० ते १.३० पर्यंत २६.२८%
३.३० पर्यंत ३९% मतदान झाले.
पिंपरी-चिंचवड
७.३० ते ९.३० ६.५६%
११.३० पर्यंत – १६%
१.३० पर्यंत – २८.७१%
३.३० पर्यंत – ४०.५% मतदान झाले.
बोगस मतदानाचे प्रकार उघड
काही मतदान केंद्रांवर मतदार पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे प्रकार समोर आले. प्रभाग क्रमांक २१ मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर शेख हसीना या महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे आढळले. तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील नरेंद्र पवार यांच्या नावावरही पूर्वीच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बोगस मतदान रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला.
कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपलाच?
प्रभाग क्रमांक २५ मधील शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर गंभीर प्रकार उघडकीस आला. कोणतेही बटण दाबले तरी मत भाजपलाच जात असल्याचा आरोप मतदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे आणि मनसेचे गणेश भोकरे यांनी केला. या गोंधळानंतर संबंधित केंद्रावरील मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवून ईव्हीएम मशिन बदलण्यात आली.
बोगस आधार कार्ड व पैशांचा संशय
उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यांतून १,५०० ते २,००० लोकांना बोगस आधार कार्डांच्या आधारे मतदानासाठी आणल्याचा आरोप त्यांनी केला. काही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कैद्याच्या नावावर मतदान
येरवडा कारागृहात असलेल्या एका आरोपीच्या नावावर प्रभाग क्रमांक २४ मध्ये मतदान झाल्याची माहिती समोर आली. मंगळवार पेठेतील अटल बिहारी वाजपेयी शाळेच्या बूथवर मोठा गोंधळ झाला.
१२८ जागांसाठी लढत
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार रिंगणात होते. उर्वरित १२६ जागांसाठी मतदान पार पडले. हे मतदान शांततेत झाले.
मत टक्केवारी जाहीर करण्यात विलंब - रोहित पवार
मतदान यंत्रणेत बिघाडानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यातही विलंब झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. अनेक केंद्रांवर दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी एकत्रितपणे टक्केवारी वाढवून बोगस मतदानासाठी मार्ग मोकळा केला जातो की काय, असा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी.
चंद्रकांत पाटील यांचा विजयाचा विश्वास
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावताना पुणे महापालिकेत भाजपला ११५ ते १२५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या मनात मोदी करिष्मा असल्याने भाजपचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणेकरांना बदल हवा – रुपाली चाकणकर
पाणी, वाहतूक व कचरा या समस्यांपासून पुणेकरांना मुक्ती हवी असून शहरात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
फुकट नको, श्वास घ्यायला जागा द्या – सुबोध भावे
अभिनेते सुबोध भावे यांनी फुकट योजनांवर टीका करताना, नागरिकांना मोकळी जागा व चांगले जीवनमान देणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
भाजपला स्पष्ट बहुमत – मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप १२० ते १२५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल, असा दावा केला असून भाजपला कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासणार नसल्याचे स्पष्ट केले.