PMC Elections 2025 : पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलं! एकत्र निवडणूक लढणार; मनसेबाबतचा निर्णय...

आगामी पुणे मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या प्राथमिक बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
PMC Elections 2025 : पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलं! एकत्र निवडणूक लढणार; मनसेबाबतचा निर्णय...
Published on

पुणे : आगामी पुणे मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या प्राथमिक बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोमवारी शहर काँग्रेस कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीत देण्यात आले.

या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच शिवसेना (उबाठा गट) चे शहराध्यक्ष संजय मोर आणि गजानन थुरकुटे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

भाजपवर हल्लाबोल

आठ वर्षांत पुण्याचा विकास थांबल्याचे आणि शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी भाजपवर केला. भ्रष्टाचाराने माखलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पुणे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवण्यावर बैठकीत चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. पुणे शहराला वेठीस धरण्यात आले आहे. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे शहराचा देशात अव्वल क्रमांक लागला आहे, असेही जगताप म्हणाले. पुण्याच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगताप यांनी निवडणुकीच्या तोंडावर काढण्यात येत असलेल्या निविदांवरून भाजपवर थेट हल्ला केला. संबंधित ठेकेदारांकडून भाजपला २०० ते ३०० कोटी रुपयांचा निवडणूक निधी दिला जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या सुरू असलेली भूमिपूजने ही पुण्याच्या भल्यासाठी नसून, पुणेकरांची फसवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री येत असल्याचा गंभीर आरोपही जगताप यांनी केला. संजय मोरे आणि गजानन थुरकुटे म्हणाले, ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्यात येईल. आगामी महापालिका निवडणूक कशी लढायची, याची रणनीती आखली जाईल. भाजपचा रथ लोकहिताचा नसून तो कसा रोखायचा, यावर चर्चा होईल.

समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी, मनसेचा निर्णय राज्य पातळीवरून

भाजपविरोधात लढण्यासाठी इतर समविचारी पक्षांनाही सोबत घेण्याचा विचार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत भाजपने इतर पक्षांतील ४६ तत्कालीन नगरसेवक आपल्या पक्षात घेतले होते, असा संदर्भ बैठकीत देण्यात आला. मात्र, सध्या आमच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असा दावाही मविआ नेत्यांनी केला. यावेळी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मविआमध्ये समावेश असेल की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय राज्य पातळीवरील नेत्यांच्या बैठकीत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in