

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अखेर अखेर एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच घड्याळासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. हा निर्णय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठीच असल्याचे सांगत संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही युती झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे अजित पवार यांनी रविवारी रात्री उशिरा पिंपरीतील सभेत घोषित केले. मात्र, पुण्यासंदर्भातील त्यांची अधिकृत भूमिका सोमवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती. तथापि, पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादीची युती पक्की मानली जात आहे.
‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हा निर्णय झाला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. महापालिकेचे बजेट हे स्वतंत्र असते. त्या माध्यमातून लोकांना सेवा द्यायची असते.
त्यामुळेच तिथे योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांशी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चा केली. अनेक कार्यकर्त्यांचे मत हे घड्याळासोबत जाण्याचेच होते. ही लढाई कार्यकर्त्यांची असल्याने त्यांचे ऐकूनच आम्ही दोन्ही पक्ष महापालिकांसाठी एकत्रित लढणार आहोत.’ ‘महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्या शक्ती सोबत विरोधात लढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी समीकरणे आहेत.
पिंपरीतील आघाडी अजित पवारांकडून जाहीर
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील सभेत रविवारी रात्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही पक्ष एकत्र येऊन या शहरातील प्रश्न मार्गी लावतील, अशी ग्वाही देतानाच दादागिरी, दमबाजीला बळी पडू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
पुण्यातील आघाडीवरही लवकरच शिक्कामोर्तब
पिंपरीप्रमाणे पुण्यातही अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आले असून, तशी घोषणा रोहित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांच्याकडूनही लवकच अधिकृत तसे जाहीर होण्याची शक्यता आहे.