

पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेतून गुरुवारी सकाळपर्यंत ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र बाहेर काढण्यात आलेल्या ९ कर्मचाऱ्यांपैकी एकाचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी दुपारपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही ६ ते ७ कर्मचारी या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची दाट शक्यता असून, त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी (वय ३३, रा. रूपीनगर, तळवडे, मूळगाव – जळगाव) यांचा मृत्यू झाला. भावेश हे मोहन वाणी यांचे एकुलते एक पुत्र होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या बहीणीचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबासाठी तेच एकमेव आधार होते.अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत वडिलांनी घरोघरी जाऊन पापड आणि पाव विकून भावेशला लहानाचा मोठा केला होता. शिक्षणात हुशार असलेल्या भावेशने शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहा वर्षापूर्वी नोकरीनिमित्त पुण्याची वाट धरली. सुरूवातीला ते पुण्यात कामाला होते व खडकीत राहत होते.
बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास मोशी कचरा डेपोमध्ये हाहाकार उडाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याच्या महाकाय डोंगराचे अचानक भूस्खलन झाले. हा कचऱ्याचा डोंगर थेट शेजारील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. त्यावेळी इमारतीमध्ये अनेक कर्मचारी आपले काम करत होते. ढिगारा थेट इमारतीवर आदळल्याने ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि आतमध्ये काम करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले.