Pune : आळंदीत १५० कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश; पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर रॅकेट केले उद्ध्वस्त

पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा यशस्वीपणे छडा लावला आहे.
Pune : आळंदीत १५० कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश; पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर रॅकेट केले उद्ध्वस्त
Pune : आळंदीत १५० कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश; पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर रॅकेट केले उद्ध्वस्त (संग्रहित छायाचित्र)
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा यशस्वीपणे छडा लावला आहे. गुंतवणुकीच्या आमिषाने देशातील विविध राज्यांतील तब्बल ६५ नागरिकांना १५० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सचिन काळे (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आळंदी पोलिसांना आरोपी सचिन काळे याच्या नावावर असलेल्या संशयास्पद बँक खात्यांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासात असे धक्कादायक वास्तव समोर आले की, आरोपीने केवळ फसवणुकीच्या व्यवहारांसाठी स्वतःच्या नावावर नऊ विविध बँकांमध्ये खाती उघडली होती. ही सर्व बँक खाती त्याने सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.

विशेष पथकाची कामगिरी

ही महत्त्वपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेत असून या मोठ्या रकमेचे व्यवहार नेमके कुठे आणि कोणासोबत झाले, याची सखोल चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने केली जात आहे.

देशभरातील नागरिकांना गंडा

या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या पोर्टलवरील नोंदीनुसार, या टोळीने इन्व्हेस्टमेंट फ्रॉड (गुंतवणूक फसवणूक) आणि इतर ऑनलाइन क्लृप्त्या वापरून देशभरातील ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने उपलब्ध करून दिलेल्या नऊ बँक खात्यांमध्ये आतापर्यंत १ कोटी १५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

आर्थिक व्यवहार करताना सा‌वध राहा!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपले बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा इतर कोणतीही आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि साधने अनोळखी व्यक्तींच्या स्वाधीन करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा साधनांचा वापर सायबर भामटे फसवणुकीसाठी करून तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकतात, त्यामुळे कोणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in