

पुणे : गणेशोत्सवात ‘चार बेस, चार टॉप’च्या पुढे ध्वनिक्षेपकाची संख्या वाढविल्यास आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे अशा ध्वनियंत्रणांना परवानगी देणे संयुक्तिक ठरणार नाही. प्रेशर मीड, प्लाझ्मा आणि लेझर लाईट याला बंदी असून गणेश मंडळांनी चार बेस आणि चार टॉपच नियंत्रणात वाजवावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजीत दहीहंडी व गणेशोत्स मंडळांच्या समन्वय बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस दल गणेश भक्तांच्या सोबत ठामपणे उभे आहे. मंडळांनी पोलीस दलावर यापूर्वी दाखविलेला विश्वास पुढेही कायम राहील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. डीजेची संख्या वाढवून आवाजाची मर्यादा ओलांडत असल्यास नियमांचे उल्लंघन होते. चार बेस व चार टॉपच्या मर्यादेत ध्वनी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. नियमांचे पालन न झाल्यास पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करावी लागेल; मात्र पोलिसांना गुन्हे दाखल करण्याची मानसिकता नसून समन्वयाने उत्सव पार पाडण्याला प्राधान्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळांना परवानगी मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी मागील परवानग्या ग्राह्य धरून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचेही आयुक्तांनी सांगताना साऊंडसाठी दोन दिवसाच्या परवानगीची गरज नसल्याचेही आयुक्त म्हणाले. गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये असेही अवाहन त्यांनी केले.
मिरवणुकीतील गर्दीचे नियोजन
लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, अलका टॉकीज परिसरातील विसर्जन मिरवणुकीसाठी गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतुकीचे नियोजन करण्यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. मेट्रोमुळे पेठ परिसरातील गर्दी वाढत असल्याने त्याचाही विचार नियोजनात केला जाणार आहे.
सोशल मीडियावर मर्यादा पाळा
सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर मर्यादा सोडून वक्तव्य करू नये. कायद्याची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारची हिंसक प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आयुक्तांनी केले.
वाहतूक, प्रकाशव्यवस्था व रस्त्यांकडे लक्ष
गणेश मंडळांच्या परिसरातील रस्त्यांची स्थिती, प्रकाशव्यवस्था आणि वाहतुकीच्या अडचणींबाबत पोलिसांनी महापालिकेशी समन्वय साधून प्रश्न सोडवावेत, असे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्याचेही सांगण्यात आले.
शहीद तुकाराम ओंबळे कुटुंबीयांचा सत्कार
दहीहंडी उत्सवानिमित्त शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस दल आणि नागरिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.