पुणे : गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे शहर पोलिसांनी यंदा नवा तांत्रिक उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मध्यवर्ती तसेच उपनगरांतील महत्त्वाच्या गणेश मंडळांचे जिओ मॅपिंग करण्यात येत असून, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, तुळशीबाग मंडळ, भाऊसाहेब रंगारी ट्रस्टसारख्या मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे उपनगरांतील नामांकित मंडळेही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाचा ठावठिकाणा, प्रवेशमार्ग, पर्यायी मार्ग, तसेच गर्दीच्या ठिकाणांची अचूक माहिती पोलिसांना जिओ मॅपिंगमुळे तत्काळ उपलब्ध होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेशोत्सव काळात दररोजच्या गर्दीचे व्यवस्थापन, मिरवणुका, तसेच उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम लक्षात घेऊन बंदोबस्ताची आखणी केली गेली आहे. जिथे जास्त गर्दी असेल तिथे अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठीही स्वतंत्र योजना आखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेले हे नियोजन उत्सव काळात सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोलाचे ठरणार असून, नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
'डिजिटल हजेरी' असे स्वरूप
या उपक्रमांतर्गत स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी रोज मंडळांना भेट देतील आणि त्याची नोंद ऑनलाइन प्रणालीमध्ये करावी लागेल. यामुळे पोलिसांची जबाबदारी अधिक पारदर्शक होईल, तसेच प्रत्येक मंडळावर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यालाच पोलिसांची 'डिजिटल हजेरी' असे स्वरूप लाभणार आहे.