गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेवर HC चा संताप; कडक शब्दांत ताशेरे

गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून हल्ला करणाऱ्‍या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्‍या पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. संबंधित आरोपींविरुद्ध ४८ तासांच्या आत गुन्हे दाखल करा, असे सक्त आदेश पुण्यातील खडकवासला पोलिसांना दिले आहेत.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेवर HC चा संताप; कडक शब्दांत ताशेरे
Published on

मुंबई : गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून हल्ला करणाऱ्‍या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्‍या पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. संबंधित आरोपींविरुद्ध ४८ तासांच्या आत गुन्हे दाखल करा, असे सक्त आदेश पुण्यातील खडकवासला पोलिसांना दिले आहेत. तक्रारदाराने वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत. यावरूनही न्यायालयाने ताशेरे ओढले.

पुण्यातील शोहेब सय्यदने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने पोलिसांच्या बेफिकिरीकडे लक्ष वेधले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्यावर हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून हल्ल्याची घटना घडली होती. याचिकाकर्ता शोहेब सय्यद व त्याच्या भावावर हर्ष केशवानी, त्याचे नातेवाईक करण, भरत व गिरीश केशवानी यांच्यासह अज्ञात साथीदारांनी हल्ला केला. त्याचबरोबर धार्मिक शिवीगाळ केली. हल्ल्यात गंभीर दुखापत झाली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात गांभीर्य दाखवले नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला. त्याची नोंद घेताना खंडपीठाने पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. याचवेळी पुढील ४८ तासांत संबंधित हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश दिले. याचिकाकर्त्याने वारंवार विनंती करूनही गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याबद्दल न्यायालयाने खडकवासला पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावा!

न्यायालयाने आपल्या आदेशात पुणे पोलीस आयुक्तांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे आणि खडकवासला पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विलंबाचे स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in