पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

पुणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर येथील स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षाची वाट धरणार याची बरीच चर्चा होती. आज अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात अधिकृतपण प्रवेश केला आहे.
पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?
छाया सौजन्य : X (@Chaitanya_Socio)
Published on

पुणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर येथील स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षाची वाट धरणार याची बरीच चर्चा होती. आज अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात अधिकृतपण प्रवेश केला आहे.

दुपारी टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट पुणे महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याच्या हालचालींमुळे जगताप नाराज होते. त्यांनी याला तीव्र विरोधही केला होता. भाजपची साथ देणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडीचा निर्णय होणार असेल तर मी बाजूला होतो, अशी त्यांची भूमिका होती. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात बळ मिळू शकते.

दोन्ही शिवसेनेकडून ऑफर, पण काँग्रेसची साथ

जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटही प्रयत्नशील होता. दोन्ही पक्षाकडून तशी ऑफरही जगताप यांना होती. पण, जगताप यांनी काँग्रेसचा हात धरला.

पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा...काँग्रेस प्रवेशानंतर जगतापांची पोस्ट

जगताप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली. "पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा... शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी "काँग्रेस" पक्षात कार्यरत होत आहे. भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक - जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे देशाचे नेते आदरणीय श्री. राहूलजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे. मला ही संधी देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे, पुणे शहरातील सर्व नेत्यांचे व मला भक्कम पाठबळ देणाऱ्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार", असे त्यांनी लिहिले.

logo
marathi.freepressjournal.in