पुणे : हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी अशपाक मकानदार हा ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली.
पुणे : हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Published on

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी अशपाक मकानदार हा ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी शुक्रवारी न्यायालयात दिली. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि अशपाक मकानदार यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अगरवाल दाम्पत्य आणि अशपाक मकानदार यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने अगरवाल दाम्पत्यासह अशपाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर म्हणाले, अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याबाबत अगरवाल दाम्पत्य आणि मकानदार यांच्यामध्ये एक मीटिंग झाली होती. ही मीटिंग कोणत्या ठिकाणी झाली? तिथे कोण-कोण उपस्थित होते? या मीटिंगमध्ये आरोपींनी डॉक्टर अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता का? याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपी अशपाक मकानदार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, तसेच अगरवाल दाम्पत्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली.

या प्रकरणाचे तांत्रिक पुरावे सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत मकानदार हा ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी डॉक्टरांना देण्यासाठी मकानदारने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये कुणाला दिले, याबाबत तो काहीएक माहिती सांगत नाही.

सरकारी वकील सुनील कुंभार यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे ॲड. हबीब मुलानी आणि ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रतिवाद केला.

logo
marathi.freepressjournal.in