Pune Porsche Accident Case: मुलाला वाचवण्यासाठी आईने दिले स्वतःचे ब्लड सॅम्पल? अहवालामुळे खळबळ

जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ४८ तासांत तपास पूर्ण केला असून...
Pune Porsche Accident Case: मुलाला वाचवण्यासाठी आईने दिले स्वतःचे ब्लड सॅम्पल? अहवालामुळे खळबळ

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या अपघात चौकशी प्रकरणी जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ४८ तासांत तपास पूर्ण केला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी जे ब्लड सॅम्पल वापरण्यात आले होते ते एका महिलेचे असल्याचे नमूद केले आहे. रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करण्यात आल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. पण, आता बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याचे समोर आल्यामुळे अल्पवयीनची आई, शिवानी अग्रवाल यांनीच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे नमुने दिल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अल्पवयीन आरोपीच्या आईने तिच्या रक्ताचा नमुना मुलाच्या रक्तासोबत बदलायला ससून रुग्णालयात दिला होता, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरांपैकी डॉ. श्रीहरी हळनोर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आईचा रक्ताचा नमुना घेतला होता, असेही म्हटले जात आहे. अशात दोन दिवसांपासून शिवानी या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे आईनेच रक्त बदलल्याच्या दाव्याला बळकटी मिळत आहे. मात्र अद्यापही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले होते की, १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचा घेतलेला रक्त नमुना टाकून देण्यात आला होता आणि त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा नमुना फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे यांच्या सूचनेनुसार सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हा बदल केला होता.

डॉक्टरांनी नाही केली नियमांची अंमलबजावणी

डॉक्टरांनी नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे आणि आरोपीला चालता येते की नाही, हे पाहणे गरजेचे असूनही ते तपासले नसल्याचे समितीच्या अहवालात नमूद असल्याचे समजते.

डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवला अतिरिक्त कारभार

रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर तर ससूनच्या शव विच्छेदन विभागाचा शिपाई अतुल घाटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

डॉ. विनायक काळे यांनी काढला पळ

पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कारवाई संदर्भात माहिती देताना म्हणाले की डॉ. श्रीहरी हळनोरची सेवा समाप्त करण्यात आली आहे. शवविच्छेदन विभागातील अतुल घटकांबळेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच डॉ. अजय तावरेच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. डॉ. तावरेला अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा अशी विनंती करणारे पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले होते. त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश मंत्र्यांनी दिले होते. डॉ. तावरे यांच्या प्रकरणाला मी जबाबदार नाही, असेही काळे यांनी सांगितले. दरम्यान, बिल्डर विशाल अग्रवालच्या पोराला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी लाखो रुपये ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकून देणाऱ्या ससून रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळवरून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यानंतर पत्रकार परिषद सोडून अधिष्ठाता विनायक काळे यांनी काढता पाय घेतला. आरोपी तावरेच्या संदर्भात प्रश्नांची उत्तरे न देता विनायक काळे तडक उठून निघून गेले.

आजोबा-वडिलांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणामध्ये पोर्शे गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना येत्या ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीच्या वडिलांचा अजून एक कारनामा

विशाल अग्रवाल याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरवरमधील एका मोक्याच्या ठिकाणावरील शासकीय जागेवरती डल्ला मारत सदर जागाच भाडेतत्वावर आपल्या खिशात घालून त्याठिकाणी विशाल अगरवाल याने पंचतारांकित हॉटेल सुरू केले आहे.सदर केवळ हॉटेलचं नाही तर तेथे परमिट रुम व बिअर बार,लिकरसह पबहीचीही 'सोय' असल्याने या विरोधात महाबळेश्वर पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर काम करून निसर्गाची हानी करत असेल तर ते चुकीचे आहे. असे बेकायदेशीर बांधकाम मग तो विशाल अग्रवाल असो अगर कोणीही, ते बुलडोझर लावून तत्काळ तोडून टाका, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in