आमदार सुनील टिंगरे
आमदार सुनील टिंगरेसंग्रहित फोटो

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणाला नवे वळण; सुनील टिंगरेंच्या अडचणीत वाढ

डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. विशेष म्हणजे...

पुणे : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ‘ब्लड सॅम्पल’मध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे वादग्रस्त आमदार सुनील टिंगरे यांनी २०२३ मध्ये शिफारस केल्याची माहिती उजेडात आली आहे.

दिनांक १९ मे रोजी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवले होते. त्यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, त्या रात्री वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्राकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही झाला. ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी पैशांचे वाटप केल्याच्या चर्चाही केल्या जात आहेत. दरम्यान, टिंगरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचा इन्कार करत येरवडा पोलीस ठाण्यात गेल्याचे मान्य केले होते. तसेच, कोणत्याही प्रकारे पोलीस कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. आता डॉ. अजय तावरे यांच्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून २०२३ मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने टिंगरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. विशेष म्हणजे या पत्रानंतर अजय तावरेंची ससून रुग्णालयाच्या डीन पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्याच महिन्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. अजय तावरेंची डीन पदावरून हकालपट्टी केली आहे. पण, आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनंतरच अजय तावरेंना ससून रुग्णालयाचे डीन केल्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण, डॉ. तावरे या प्रकरणात आता आरोपी बनले आहेत. दरम्यान, सुनील टिंगरे हे देवदर्शनासाठी बाहेर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली?

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. २९ डिसेंबर २०२३ रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते, तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यामुळे तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे - नाना पटोले

मुंबई : राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे, तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करून सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या, पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते. यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकिलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरू आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबनी थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले. तरीही त्यांना १० तासांत जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावरेंनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या. येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावरे यांना अधीक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिंमत होतेच कशी. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपने केले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in