Pune Porsche Accident: विशाल अगरवालचे रिसॉर्ट 'सील'

Vishal agarwal: सध्या राज्यातच नव्हे तर देशातही पुणे पोर्शे 'हिट अँड रन' कार अपघात प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणातील संशयित विशाल अगरवाल याचे महाबळेश्वर येथील एमपीजी क्लब हे अनधिकृत रिसॉर्ट प्रशासनाने शनिवारी सकाळी सील केले.
Pune Porsche Accident: विशाल अगरवालचे रिसॉर्ट 'सील'
Published on

कराड/रामभाऊ जगताप

सध्या राज्यातच नव्हे तर देशातही पुणे पोर्शे 'हिट अँड रन' कार अपघात प्रकरण चांगलेच तापले असून या प्रकरणातील संशयित विशाल अगरवाल याचे महाबळेश्वर येथील एमपीजी क्लब हे अनधिकृत रिसॉर्ट प्रशासनाने शनिवारी सकाळी सील केले. दरम्यान, महाबळेश्वरसह पाचगणी येथे प्रशासनाकडून सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदा उद्योग, व्यावसायिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

महाबळेश्वर येथील सिटी सर्वे नंबर २३३ ही शासकीय मिळकत सन १९९७ साली पारसी जिमखाना ट्रस्ट यांना ३० वर्षाकरिता भाडेकराराने देण्यात आली होती. याच शासकीय इमारतीचा भाडेकरार हा दर ३० वर्षांनी वेळोवेळी नूतनी करण्यात आला होता. सन २०१६ साली स्वतः पारसी नसलेले विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांना या ट्रस्टवर घेण्यात आले. यानंतर हळूहळू पारशी जिमखाना वरील सभासदांची नावे हटवून अगरवाल कुटुंबीयांची नावे ट्रस्टवर चढवण्यात आली. मुळातच फक्त रहिवासी वापराकरिता भाडे करारावर देण्यात आलेल्या मिळकतीचा वापर अगरवाल यांनी विनापरवाना बेकायदा आलिशान रिसॉर्ट बांधून या इमारतीचा वाणिज्य वापर करण्यास सुरुवात केली. या रिसॉर्टबाबत अनेकदा तक्रारी झाल्या होत्या, परंतु यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. पुणे अपघात प्रकरणात अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाचा प्रताप उघड झाल्यापासून अगरवालच्या या रिसॉर्टबाबत असणारे कनेक्शन उघड झाले व ते बेकायदा असल्याने यावर टीकेची झोड उठली. त्यातच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळचाच हा प्रकार असल्याने त्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनामार्फत या रिसॉर्टवरती कारवाई करण्यास सुरुवात झाली.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवसापूर्वीच अगरवाल यांच्या एमपीजी या रिसॉर्टमधील अनधिकृत बार सील केला होता. फक्त रहिवासी करता असणाऱ्या शासकीय इमारतीमध्ये सुरू असलेल्या अगरवाल यांच्या रिसॉर्टवर शनिवारी कारवाई करत जिल्हा प्रशासन तसेच नगरपालिका व पोलिस प्रशासनाने रिसॉर्टमधील ३२ रूम ८ टेंट हाऊस, किचन, हॉल, स्पा व जिम असे एकूण ४४ रूम सील केले.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तहसीलदार तेजस्विनी पाटील व कर्मचारी, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश पाटील व नगरपरिषद कर्मचारी, महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

८० कर्मचारी बेरोजगार

पुणे येथील पोर्शे 'हिट अँड रन' कार अपघात प्रकरणामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असणाऱ्या अन्य अधिकृत रिसॉर्टवर कारवाईला जोर धरू लागला आहे. पाचगणी येथील हॉटेल फर्न तर महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब सील झाल्याने पाचगणी येथील हॉटेल हॉर्न येथील सुमारे ७० तर महाबळेश्वर येथील एम पीजी क्लब येथे काम करणारे सुमारे ८० कर्मचारी बेरोजगार झाले. पावसाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू असून इतक्या वर्षात अनधिकृत बांधकामांवरती कारवाई का झाल्या नाहीत ? झोपलेल्या प्रशासनावरती

शासन काय कारवाई करणार आदी सवालही विचारले जात आहे. या कारवाईमुळे तिथे राहिलेल्या १४० पर्यटकाना देखील नाहक त्रास सहन करावा लागला असून त्यांना रूम सोडायला लागले तर अन्य ठिकाणी तात्काळ रूम मिळू शकल्या नाहीत व त्यांचे पैसेही बुडाले. त्यामुळे याबाबत पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी असल्या कारणाने त्यांना दुसरीकडे लॉजिंग मिळणे ही अवघड झाले आहे.

'द फर्न' हॉटेल केले सिल

पाचगणी येथील' द फर्न' या एका पंचतारांकित 'बिग बी' हॉटेल व्यावसायिकाने प्रशासनाचे नियम, कायदे पायदळी तुडवून रहिवाशी वापर असतानाही व्यावसायिक वापर केल्याचे आढळून आले. त्यामुळे हे हॉटेल शनिवारी पाचगणी नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाने 'सिल' केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in