

पुणे : पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या २२ महिन्यांपासून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अग्रवाल यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे २०२४ रोजी झालेल्या या भीषण अपघातात, एका भरधाव पोर्शे कारने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांना चिरडले होते, ज्यामध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि तेव्हापासून हा खटला सतत चर्चेत राहिला आहे.
अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी सोपवण्यासोबतच, अपघातानंतर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आणि रक्ताचे नमुने बदलल्याचा गंभीर आरोप विशाल अगरवाल यांच्यावर ठेवण्यात आला होता. या कटात त्यांच्या पत्नी शिवानी अगरवाल आणि ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांचाही सहभाग असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता.२१ मे २०२४ रोजी अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील इतर सह-आरोपींना मिळालेला जामीन आणि अगरवाल यांच्या प्रदीर्घ कोठडीचा विचार करून त्यांना दिलासा दिला आहे.
जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल यांच्यावर अत्यंत कडक अटी आणि शर्ती लादल्या आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, विशाल अगरवाल यांनी खटल्याच्या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणे अनिवार्य आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदारांशी संपर्क साधू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास त्यांचा जामीन तात्काळ रद्द केला जाईल, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशात नमूद केले आहे
या प्रकरणात आतापर्यंत डॉ. अजय तावरे, शिवानी अगरवाल आणि आशिष मित्तल यांच्यासह इतर आरोपींना जामीन मिळाला आहे, तर ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे हे अद्याप कारागृहात आहेत
विशाल अगरवाल हे पुण्यातील नामांकित ब्रम्हा कॉर्प या बांधकाम समूहाचे प्रमुख असून, त्यांच्या मुलाने केलेल्या या अपघातामुळे अगरवाल कुटुंबाला मोठ्या कायदेशीर संघर्षाला सामोरे जावे लागत आहे