
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये एक रॅप गाणे चित्रित करण्यात आले. या गाण्यामध्ये शिव्यांचा उपयोग केला असून बंदूक आणि दारूच्या बॉटल्सचा वापर केला आहे. एवढाच नव्हे तर रॅपर हे सर्व कुलगुरूंच्या खुचीवर बसून चित्रित करण्यात आले आहे. युट्युबवर हे गाणे प्रदर्शित होताच मोठा गोंधळ उडाला आणि या कथित अश्लील रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव ऊर्फ रॉकसन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर बोलताना शुभमने सांगितले की, "हे गाणे अश्लील नसून यामध्ये सकारात्मक विचार मांडण्यात आला आहे. तसेच, या गाण्यामधून समाजाचे प्रतिबिंब मांडले असल्यामुळे कोणीही चिडायचे कारण नाही," असे ताणें म्हंटले आहे. पुढे तो म्हणाला की, "शिव्या देणे हा जर गुन्हा असेल तर भारतात गुन्हेगारांसाठी तुरुंग आणि पोलीस चौक्या कमी पडतील. आम्ही कलाकार असून समाजाचा आरसा आहोत. शिवी देणे हा गुन्हा होऊ शकत नाही. नामदेव ढसाळ, मन्टो, ग्रेस यांच्या कवितांमध्येही शिव्या आहेत." असे स्पष्टीकरण त्याने दिले.
दरम्यान, पुण्यातील विद्यापीठामध्ये केलेल्या चित्रीकरणावरून त्याने सांगितले की, "मी विद्यापीठाची परवानगी न घेता गाण शूट केले हा खोटा आरोप आहे. यासाठी मी रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार यांच्याकडून रितसर परवानगी घेतली होती. पण ती लेखी नसून तोंडी घेतली होती." असे त्याने स्पष्ट केले. तसेच, "राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख झांबरे यांनी विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केली. तर, विद्यापीठीने थेट पोलिसांकडे जात तक्रार केली. हेच जर ते माझ्याकडे आले असते तर मी हे गाणे युट्यूबवरुन हटवले असते." असेदेखील तो म्हणाला. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून याप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येऊ शकते.