पुणे पाऊस बळींची संख्या सातवर; तीन जण अद्यापही बेपत्ता; अनेकांचे संसार गेले वाहून

पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, खडकवासला धरणातून होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील पूर ओसरल्याचे चित्र शुक्रवारी होते. मात्र, या पुरात अनेकांचे संसार वाहून गेल्याने त्यांच्यासमोर नव्याने उभे राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पुणे पाऊस बळींची संख्या सातवर; तीन जण अद्यापही बेपत्ता; अनेकांचे संसार गेले वाहून
पीटीआय
Published on

पुणे : पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, खडकवासला धरणातून होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील पूर ओसरल्याचे चित्र शुक्रवारी होते. मात्र, या पुरात अनेकांचे संसार वाहून गेल्याने त्यांच्यासमोर नव्याने उभे राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, पुण्यातील बळींची संख्या सातवर पोहोचली असून, तीन जण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर पुणे शहर व परिसराला पावसाने तडाखा दिला. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले. त्याचबरोबर डेक्कन, पुलाची वाडी परिसरालाही पावसाचा फटका बसला. त्यानंतर एनडीआरएफने पूरस्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. गुरुवारी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. रात्री पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पूर ओसरत गेला.

आता चूल पेटणार कशी?

पूर ओसरल्यानंतर पुण्यातील भीषण वास्तव समोर आले आहे. बाधित घरांमध्ये गाळ व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, अनेकांच्या घरातील चीजवस्तू अक्षरशः मातीमोल झाल्या आहेत. हा गाळ, चिखल व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पावसामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाद्या, उशा व अन्य साहित्यही खराब झाल्याने नव्याने संसार उभा करण्याचे आव्हान या नागरिकांसमोर आहे. घरातील किराणामाल खराब झाला. सिलिंडर वाहून गेला. आता चूल पेटणार कशी, असा सवाल पूरग्रस्त नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केला. दुसरीकडे ना वीज, ना पाणी, अशी अवस्था येथील नागरिकांची झाली. त्याचबरोबर या परिसरात रोगराई पसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने औषधांची फवारणी करण्याचेही आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मोहोळ यांची बाधित भागाला भेट

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यासह एकूणच जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर व विठ्ठलनगर परिसराला त्यांनी भेट दिली व तेथील नागरिकांशी चर्चा केली. यावेळी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले.

पुराला हलगर्जीपणाच कारणीभूत - सुप्रिया सुळे

पुण्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एकतानगर भागात पाहणी करीत नागरिकांशी चर्चा केली. या पुराला प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - मुख्यमंत्री

पुणे आणि लगतच्या परिसरात अतिवृष्टीनंतर आता गाळ व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून या पूरग्रस्त भागात डीप क्लिनिंग, औषध फवारणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, नुकसान झालेल्या ठिकाणांचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in