

पुणे : वाचनाची चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तक वाचन करून, छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली. सकाळी ११ ते दुपारी १२ या तासाभरात ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तक वाचन करून आपले छायाचित्र वेबसाइटवर अपलोड केले. हा उपक्रम केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव २०२५ येत्या १३ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम मंगळवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, संघटनांची कार्यालये अशा सर्वच ठिकाणी नागरिक आवडीची पुस्तके वाचत होते.
वाचन ही केवळ वैयक्तिक सवय नसून, समाजाला वैचारिक दिशा देणारी शक्ती आहे. आज ‘शांतता... पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमात हजारो नागरिकांनी पुस्तक हातात घेऊन दिलेल्या सहभागाने वाचनसंस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रत्येक वाचकाचा एक फोटो म्हणजे फक्त एक नोंद नाही, तर ज्ञान, प्रबोधन आणि विचारमूल्ये जपणाऱ्या समाजाची नांदी आहे. पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे आम्ही तरुणाईत गंभीर, सशक्त आणि वैचारिक बदल घडवण्याचे स्वप्न पाहतो आणि आजच्या प्रतिसादाने ते स्वप्न अधिक दृढ झाले आहे.
राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव