

वरद भातखंडे / पुणे : पुणे शहर आणि परिसरातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठा वेग देत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी तीन प्रमुख उन्नत रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हेही उपस्थित होते.
सुमारे १८,००० कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प पुण्याकडे येणाऱ्या काही अत्यंत वर्दळीच्या महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि जलद प्रवास उपलब्ध करून देणे या उद्देशाने आखण्यात आले आहेत. यामध्ये ५३.४ किमी लांबीचा पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती मार्ग, ३१.५ किमीचा हडपसर-यवत उन्नत महामार्ग आणि ५३.२ किमीचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत रस्ता यांचा समावेश आहे.
कार्यक्रमानंतर फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पांमुळे वेगवेगळ्या दिशांनी पुण्यात येणारी वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. "हडपसर-यवत कॉरिडॉर असो की चाकण-शिक्रापूर मार्ग, हे तिन्ही प्रकल्प कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी करतील. या रस्त्यांवरील प्रवासाचा वेळ जवळपास ५० मिनिटांनी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या रस्त्यांचे नियोजन प्रस्तावित मेट्रो नेटवर्कसह करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, काही ठिकाणी वाहतुकीचे चार स्तर पाहायला मिळतील. सर्वात खाली रस्ता, त्यावर आऊटर रिंग रोड, त्यानंतर उन्नत रस्ता आणि सर्वात वर मेट्रो असेल. या नियोजनामुळे मेट्रो बांधकामाचा खर्चही कमी होईल.
सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे हे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी एक बनले आहे. पुण्यातील ट्रॅफिक जाम ही एक गंभीर समस्या आहे. कोंडीसोबतच प्रदूषण हीही मोठी चिंतेची बाब बनली आहे. पुणे-मुंबई, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-कोल्हापूर या महामार्गावर आज विक्रमी वाहतूक होत आहे, असे ते म्हणाले. रस्ते रुंदीकरणासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने हे काम कठीण असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे नवीन उन्नत कॉरिडॉर नियोजित करण्यात आले आहेत. आम्ही जाहीर केलेले प्रकल्प आता प्रत्यक्षात येत असल्याचा मला आनंद आहे.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, बांधकाम काळात नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी काम सुरू होण्यापूर्वी सविस्तर वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल. हे प्रकल्प डीबीएफओटी मॉडल अंतर्गत राबवले जाणार असून, बांधकाम सुरू झाल्यापासून चार वर्षांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील कामासाठी एमएसआयडीसीमहामेट्रोसोबत समन्वय साधेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोल आकारला जाईल आणि टोल प्लाझाची ठिकाणे आधीच निश्चित करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विमानतळाचे भूसंपादन जोरात
प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ५० टक्क्यांहून अधिक जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, लवकरच टेंडर (निविदा) प्रक्रिया सुरू होईल. आम्ही विमानतळासाठी रस्ता आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या सुसाध्यतेचा अभ्यास करत आहोत. दिवे घाटातून जोड बोगदा बांधल्यास पुरंदर विमानतळासाठी हाय-स्पीड मार्ग उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
४ वर्षांत काम पूर्ण होणार :
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ या तिन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी करणार आहे. बांधकाम संस्थांची नियुक्ती करण्यासह प्राथमिक कामे पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले की, प्रकल्पांचे काम टप्प्याटप्प्याने केले जाईल, जेणेकरून संपूर्ण प्रकल्पाची वाट न पाहता पूर्ण झालेले टप्पे वाहतुकीसाठी खुले करता येतील. या कॉरिडॉरमध्ये उन्नत आणि जमिनीवरील अशा दोन्ही मार्गांचा समावेश असून, जेथे आवश्यक असेल तेथे भविष्यातील मेट्रो विस्तारासाठी तरतूद करण्यात आली आहे. खराडी जकात नाका ते कोंढापुरी दरम्यानचा ३५ किमीचा उन्नत टप्पा हा या तिन्ही प्रकल्पांमधील सर्वात लांब उन्नत भाग असेल.