

पुणे : तुळजापूरहून पुण्याच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एका धावत्या ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसला सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावर अचानक भीषण आग लागली. अपोलो हॉस्पिटल आणि एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर ही दुर्घटना घडली. बसच्या दर्शनी भागातून अचानक मोठ्या प्रमाणावर धूर आणि ज्वाळा निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास येताच, चालक आणि वाहकाने अत्यंत प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. चालक, वाहक, स्थानिक नागरिक, पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या तात्काळ मदतीमुळे २० प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
प्रवासी आणि कर्मचारी बसमधून बाहेर पडल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग नोंदवला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मध्यवर्ती केंद्राचे प्रमुख प्रशांत गायकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन चव्हाण, एकनाथ कुंभार, साखरे, बंडे, पेठकर, गायकवाड, धावडे आणि जाधव या जवानांच्या पथकाने एका बंब आणि टँकरसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा सुरू करून अवघ्या ५ ते १० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
आगीची तीव्रता मोठी असतानाही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमधील १० बॅटऱ्या सुरक्षित ठेवल्या. जर या बॅटऱ्यांनी पेट घेतला असता तर मोठा स्फोट होऊन अत्यंत भयानक दुर्घटना घडली असती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रशांत गायकर यांनी दिली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसने पेट घेतल्यानंतर शंकरशेठ रस्त्यावर धुराचे मोठे लोट पसरले होते आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.