पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयासमोर बुधवारी दुपारी गँगवॉर भडकल्याने शहर पुन्हा एकदा हादरले. भावाच्या खून प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याला न्यायालयासमोर गाठून हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्याचे दोन्ही हात तोडले.
पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला
Published on: 

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयासमोर बुधवारी दुपारी गँगवॉर भडकल्याने शहर पुन्हा एकदा हादरले. भावाच्या खून प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याला न्यायालयासमोर गाठून हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्याचे दोन्ही हात तोडले. त्याचबरोबर त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करत क्रौर्याची परिसीमा गाठली. भररस्त्यावर एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे थरारक घटना घडल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयातील वकिलांसह पक्षकारांमध्ये घबराट उडाली असून, याप्रकरणी दोन सूत्रधारांना पुण्यातून, तर तीन हल्लेखोरांना दौंड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, भरदिवसा गोळीबार, कोयते उगारून दहशत माजवण्याच्या या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंदार मारूती किवळे (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे असल्याचे ससून रुग्णालयाचे डीन डॉ. येल्लाप्पा जाधव यांनी सांगितले. कात्रज भागातील संतोषनगरमध्ये शुभम सुभाष चव्हाण (२८) याचा २० एप्रिल रोजी जमिनीच्या वादातून खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे, अमर दिलीप साकोरे, गिरीष सुभाष वावरे, योगेश बाबूराव डोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणात पसार झालेल्या किवळे याच्यासह चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली होती. किवळे याला खून प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर तो १८ नोव्हेंबर रोजी कारागृहातून बाहेर आला.

किवळे हा बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात आला असता दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी किवळेला गाठले व त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही हातांचे पंजे तुटले. या हल्ल्याचा कथित सूत्रधार अक्षय चव्हाण हा असून बाब्या पवार, यानप्या, रोहन कानगुडे, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण अशी अन्य हल्लेखोरांची नावे आहेत.

हल्लेखोरांनी किवळे याच्यावर हल्ला केल्यानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिक व वकिलांमध्ये घबराट उडाली. गंभीर जखमी झालेला किवळे हा मदतीसाठी याचना करत होता. मात्र, हल्लेखोरांनी कोयते उगारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी कोणीही धावले नाही. हल्लेखोर दोन दुचाकीवरून पसार झाल्यानंतर जखमी अवस्थेतील किवळे हा १० ते १२ मीटर अंतर चालत गेला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. काही अंतरावर असलेल्या न्यायालयीन बंदोबस्तातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील किवळे याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील तीन हल्लेखोरांना दौंड येथून, तर दोन सूत्रधारांना पुण्यातून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन म्हणाले की, “आरोपींनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात गोळ्या शिरल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावऊन दोन पिस्तुले जप्त केली आहेत. हल्ल्यातील आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली.”

आरोपींना सोडणार नाही - सुनेत्रा पवार

आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी मांडली.

अक्षय चव्हाणने दिली सुपारी

दरम्यान, आपला भाऊ शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाण यानेच या हल्ल्याची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या हत्येमुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)