Pune Shivshahi Bus Rape : आरोपी गाडेला १२ दिवसांची पोलीस कोठडी; फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार

स्वारगेट एसटी स्थानक परिसरात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुणाट गावच्या हद्दीतून गुरुवारी रात्री उशिरा नाट्यमयरीत्या अटक केली.
Pune Shivshahi Bus Rape : आरोपी गाडेला १२ दिवसांची पोलीस कोठडी; फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार
Published on

पुणे : स्वारगेट एसटी स्थानक परिसरात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुणाट गावच्या हद्दीतून गुरुवारी रात्री उशिरा नाट्यमयरीत्या अटक केली. श्वान पथकाचा माग, ड्रोनची नजर, सुमारे ५०० पोलीस कर्मचाऱ्यांसह गावातील ४०० ग्रामस्थांचे सहकार्य यातून आरोपीचे लोकेशन सापडल्यानंतर उसाच्या फडाजवळील कालव्याच्या खड्ड्यातून गाडे यास जेरबंद करण्यात आले.

पुण्यातील स्वारगेट स्थानकावर फलटणला जाण्यासाठी निघालेल्या तरुणीची दिशाभूल करून तिला बंद एसटी बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रेय गाडे याच्या मागावर गेले दोन दिवस पोलीस पथके होती. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून आरोपीची ओळख पटवण्यात आली होती. आरोपीने गेल्या काही दिवसांत फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी करण्यात आली. त्यातून आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्यातील शिरूर तालुक्यातील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांची १० पथके दत्तात्रेय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली. गुरुवारी दिवसभर दत्तात्रय गाडेचा गावातल्या उसाच्या फडात शोध घेण्याचे काम पोलिसांनी केले. पण, तो सापडत नव्हता. ड्रोनच्या माध्यमातूनही त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रात्र झाली आणि बिबट्यांचा वावर असल्याने कारवाई थांबवण्यात आली. अशातच भूक लागल्याने रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे आला. तिथे त्याने आपल्याला खूप भूक आणि तहान लागल्याचे सांगितले. आपल्याला थोडे जेवण आणि प्यायला पाणी देण्याची मागणी त्याने केली. यावेळी नातेवाईकाने त्याला फक्त पाण्याची बाटली दिली. मात्र, याबाबतची माहिती त्यांनी लगेचच गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित गावकऱ्यांनी लगेचच हे पोलिसांना कळवले. गाडे गावातल्याच उसाच्या शेतात जाऊन लपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या परिसराला वेढा घातला. ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवले आहे, तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये, अशी घोषणा पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर गाडे कॅनॉलच्या खड्डयातून बाहेर येऊन उभा राहिला आणि पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.

एसटी स्थानकांचे सेफ्टी ऑडिट

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरातील महिला सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील एसटी स्थानक येथील सेफ्टी ऑडिट केले जात आहे. मनपासोबत एकदा पुन्हा ‘डार्क स्पॉट’ जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. आरोपीचा शोध उशिरा लागला असला, तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपीबाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे स्वतः मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे.

आरोपीला कडक शिक्षेसाठी प्रयत्नशील - पोलीस आयुक्त

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला आम्ही सोडणार नाही. आरोपीला कठोरात कठोर कडक शिक्षा करण्याबाबत पोलीस प्रयत्नशील राहतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलीस यांच्यात कोणताही श्रेयवाद नाही. सर्व पोलीस यंत्रणा तपासात सक्रिय होत्या. तीन दिवस रात्रंदिवस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. त्यामुळे हे एकत्रित ऑपरेशन होते. आरोपीबाबत तक्रार आल्यावर तातडीने त्याचे नाव निष्पन्न करण्यात आले. त्यानंतर त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. ग्रामस्थ आणि पोलीस एकत्रित काम करत होते. गावात नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आरोपीला गावाबाहेर पडणे शक्य झाले नाही. ज्या ग्रामस्थाने आरोपीबाबत माहिती दिली, त्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. गावासाठीदेखील काही करता येईल का, याबाबत आम्ही विचार करू.

२२ जानेवारी २०२४ रोजी आरोपीविरोधात एक गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यापूर्वी २०१९ मध्ये त्याच्यावर पाच चोरीचे गुन्हे अहिल्यानगर आणि पुणे येथे दाखल आहेत. यापुढे ज्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त वाढवली जाईल. बस स्थानकात जे अवैध गैरप्रकार सुरू आहेत, त्याबाबत आढावा घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.

गृह राज्यमंत्री योगेश कदमांची सारवासारव

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कदम यांनी शुक्रवारी याप्रकरणी सारवासारव केली. ते म्हणाले,‘माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मी गुरुवारी स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली. तेव्हा माझ्या लक्षात आले की, घटना घडलेल्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. ती नेहमी वर्दळ असणारी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कुणी तिला वाचवण्यासाठी का गेले नाही? असा प्रश्न मला पडला. हा प्रश्न मी माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना सांगितले. पण आता माझ्या त्या विधानाचा विरोधक विपर्यास करून राजकारणासाठी वापर करत आहेत.’

आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी

अटकेनंतर आरोपी दत्तात्रेय गाडेला शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

गुन्ह्यानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीचे छायाचित्र माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने गळफास घेऊन तसेच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार

या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयामध्ये केस चालवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

बोलताना संवेदनशीलता बाळगा, मुख्यमंत्र्यांची तंबी

‘पीडितेने स्ट्रगल केला नाही’, असे गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटले होते, तर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही, ‘अशा घटना पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घडतच असतात’, असे वादग्रस्त विधान केले होते. या दोन्ही मंत्र्यांच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी दोन्ही मंत्र्यांचा भरपूर समाचार घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘अशा घटनांत मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता बाळगली पाहिजे’, अशी तंबी दोन्ही मंत्र्यांना दिली.

logo
marathi.freepressjournal.in