
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी मंगळवारी संध्याकाळी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान असून दरोडोखोरांनी त्यांच्याकडील बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील २० ते २५ तोळे सोने लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तूल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
सिंहगड परिसरातील धायरी येथील मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सिंहगड परिसरातील धायरी येथील श्री ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात तीन दरोडेखोर ग्राहक असल्याचा भासवत दुकानांत घुसले. त्यानंतर त्यातील एकाने बंदुकीचा धाक दाखवत सराफाकडून सोन्याची मागणी केली. विरोध केला असता सराफाला आणि त्याच्या कामगारांना त्या दरोडेखोरांनी मारहाण केली. त्यानंतर सोन्याची लूट करत दरोडेखोरांनी पळ काढला.
याबाबत पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री सराफ दुकानात दुकानमालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला. सोन्याची चेन दाखवा, असे सांगून मालक सोन्याची चेन दाखवत असताना आणखी दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात शिरले. त्यांनी पिस्तूल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करत अंदाजे २० ते २५ तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने हिसकावले. दरम्यान, दुकानमालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पिस्तुलच्या बटने मारहाण करून दुचाकीवरून फरार
झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेत वापरलेली बंदूक ही खेळण्यातली असल्याचे समोर येत आहे.