
पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त अथर्वने रविवारी (दि.२४) एक रील व्हिडिओ अपलोड केला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा व्हिडिओ अथर्वने शेअर केला होता. मात्र, याच व्हिडिओवरून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला, धमक्याही मिळत होत्या. परिणामी, काही तासांतच अथर्वने व्हिडिओ तर डिलीट केलाच शिवाय जाहीर माफीही मागितली आहे.
अक्कल शिकवू नकोस-
व्हिडिओ समोर येताच ब्राह्मण महासंघाने अथर्व सुदामेला लक्ष्य केले होते. सुदामेने केवळ मनोरंजन करावे, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये. तू फक्त तुझा करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव, असे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे म्हणाले होते. "अथर्व सुदामेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो हिंदू-मुस्लिम ऐक्याची काहीतरी अक्कल शिकवतोय. दूधात टाकलेली साखर ही साखरेचे काम करतेय की विषाचे काम करतेय, हे गेल्या ७००-८०० वर्षांपासून हिंदू भोगत आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वत:चं पोटभर. यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस", असे म्हणत दवे यांनी सुदामेवर प्रखर टीका केली होती.
डिलिट केलेल्या व्हिडिओमध्ये काय होतं?
गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या रीलमध्ये अथर्व बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. कारखान्यातील अनेक मूर्त्यांपैकी एक मूर्ती तो निवडतो. त्याचवेळी मूर्तीकाराचा मुलगा 'अब्बू' हाक मारत तेथे येतो आणि 'अम्मी ने आप के लिये खाना भेजा है', असे सांगतो. आता ग्राहक (अथर्व) आपल्याकडून मूर्ती खरेदी करणार नाही असा मूर्तीकाराचा समज होतो. त्यामुळे, पुढेपण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथूनही मूर्ती घेऊ शकतात असे मूर्तीकार म्हणतो. पण, मला येथून मूर्ती घेण्यास काहीच समस्या नाही, असे अथर्व मूर्तीकाराला सांगतो. इथून मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? असे मूर्तिकार पुन्हा त्याला विचारतो. त्यावर, तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे असे सांगताना "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावे जी शेवयांची खीरही गोड बनवते आणि शीरखुर्माही. आपण वीट व्हावे जी मंदिरसुद्धा उभारते आणि मशिदसुद्धा", असा अथर्वचा संवाद होता.
मागितली जाहीर माफी
अथर्व सुदामेने व्हिडिओसाठी माफी मागितली आहे. "माझ्या व्हिडिओमुळे बरेच लोकं नाराज झाले. त्यांना व्हिडिओ आवडला नाही. कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा माझाय अजिबात उद्देश नव्हता. मी आतापर्यंत आपल्या हिंदू सणांवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर खूप व्हिडिओ केलेत. आपल्या सणांवर, संस्कृतीवर माझ्याऐवढे व्हिडिओ अन्य कोणत्याही क्रिएटरने केलेले नाहीत. त्यामुळे माझ्या मनात कोणाला दुखावण्याचा अजिबातच कोणता उद्देश नव्हता. पण तरीही तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो." असे तो एक व्हिडिओ जारी करीत म्हणाला.
दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणावरून संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.