पुण्यात साऊंड व्यावसायिकांचा 'मूकमोर्चा'; समान नियमावली लागू करण्याची मागणी; कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याची तक्रार

साऊंड, डीजे, लाईट, मंडप, इव्हेंट आणि संबंधित व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा साऊंड, लाईट अँड जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.
पुण्यात साऊंड व्यावसायिकांचा 'मूकमोर्चा'; समान नियमावली लागू करण्याची मागणी; कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याची तक्रार
पुण्यात साऊंड व्यावसायिकांचा 'मूकमोर्चा'; समान नियमावली लागू करण्याची मागणी; कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याची तक्रार
Published on

पुणे : साऊंड, डीजे, लाईट, मंडप, इव्हेंट आणि संबंधित व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा साऊंड, लाईट अँड जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

व्यावसायिकांवर होणारी कारवाई थांबवावी, जप्त केलेली साऊंड उपकरणे तातडीने परत करावीत आणि व्यवसायासाठी स्पष्ट व समान नियमावली लागू करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष सागर सुतार, सचिव राजू सोनावणे, खजिनदार मनोज भोसले तसेच रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे संस्थापक गजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने व्यावसायिक मोर्चात सहभागी झाले.

साऊंड व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, नियम व अटींचे पालन करूनही होणारी कारवाई, साऊंड सिस्टिम आणि अन्य साहित्य जप्त करण्याच्या पद्धतीमुळे व्यावसायिक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. साऊंड व्यावसायिकांना कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करण्याची संधी द्यावी, जप्त केलेली साधने नियमानुसार तातडीने परत करावीत आणि अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी अध्यक्ष गणेश काळभोर यांनी केली.

विद्यानंद बापट यांनी माध्यमांमधून उत्सवांचे वातावरण गढूळ केल्याचा आरोपही काळभोर यांनी केला. त्यांना विधायक किंवा धोरणात्मक काही करायचे होते, तर त्यांनी न्यायालयात दाद मागायला हवी होती, असेही त्यांनी सांगितले.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

साऊंड व्यावसायिकांच्या अडचणींबाबत शासन आणि प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. ढोल-ताशा पथक, बँड पथक, हलगी पथक, सनई-चौघडे आणि तुतारी यांना ध्वनीपातळीच्या नियमांमध्ये सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे साउंड व्यावसायिकांनाही समान सवलत मिळावी. कारवाई करायची असेल, तर सर्वांसाठी समान नियम लागू करावेत. एखाद्या व्यवसायावर बंदी किंवा जप्तीची कारवाई करून व्यावसायिकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आणू नये, अशी मागणी उपाध्यक्ष सागर सुतार यांनी केली. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांमुळे साऊंड सिस्टिम व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुतार यांनी दिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in