
मुंबई : भारत-पाकिस्तान संघर्षावरील सोशल मीडिया पोस्टमुळे अटकेत असलेल्या पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीची पुणे येथील येरवडा जेलमधून बुधवारी सुटका झाली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. न्यायालयाने तिच्या शिक्षणसंस्थेला देखील झापले असून, सिंगड अॅलकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगने दिलेला तिच्या कॉलेजमधून काढून टाकण्याचा (रस्टिकेशन) आदेशही न्यायालयाने तात्पुरता स्थगित केलेला आहे.
विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरची असून, २०२३ मध्ये सिंगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती. ७ मे रोजी तिने 'रिफॉर्मिस्तान' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भारत सरकारच्या धोरणांवर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती.
गुन्हा काय?
९ मे रोजी पुण्याच्या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर अटक झाली. ती येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होती. त्यानंतर वकील फरहाना शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी तिच्या रस्टिकेशनचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. जामीन आणि गुन्हा रद्द करण्याचीही विनंती केली होती.
सुटका कशी?
मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणातील सरकारी प्रतिसाद धक्कादायक आणि अतिरेकी होता. उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर करत तिचे "तिला कट्टर गुन्हेगार" बनवल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला फटकारले होते. न्यायालयाने विद्यार्थिनीला तात्काळ मुक्त करण्याचा आदेश दिला.