

पुणेः मराठी साहित्याचा गौरवशाली वारसा जपणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ पुण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून देशभरात ९९ एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही माहिती संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाऊंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात होणार आहे. या संमेलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी - महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील विविध शहरांमध्ये ९९ एकदिवसीय संमेलने आयोजित केली जाणार आहेत. समाजातील विविध घटकांच्या साहित्यनिर्मितीला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणे आणि स्थानिक वैशिष्ट्ये जपत प्रत्येक मराठी माणसाला शंभराव्या संमेलनाशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेशी संलग्न शाखांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि सुमारे १७० निमंत्रित सहभागी झाले. एकदिवसीय संमेलनांची रूपरेषा, स्थानिक साहित्यिकांचा सहभाग, कार्यक्रमांचे नियोजन आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या माहितीनुसार, ही ९९ संमेलने १४ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. त्यांचे सविस्तर वेळापत्रक, स्थळे आणि कार्यक्रमांची माहिती टप्प्याटप्याने जाहीर केली जाणार आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हासाठी राष्ट्रीय खुली स्पर्धा
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक परंपरेचा गौरव वाढविणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अधिकृत बोधचिन्ह निवडण्याकरिता राष्ट्रीय खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्पर्धकांनी आपले बोधचिन्ह ३१ ऑगस्टपर्यंत पाठवायचे असून, सर्वोत्तम बोधचिन्हाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकास ५१
हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतातील सर्व कलाकार, डिझायनर, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुली आहे. बोधचिन्ह जेपीजी, जेपीईजी किवा व्हेक्टर पीडीएफ स्वरूपात पाठविणे अनिवार्य आहे. प्रविष्टीसोबत १०० ते १५० शब्दांचे मराठी भाषेतील संकल्पना स्पष्टीकरण जोडणे आवश्यक आहे.