

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका कंत्राटदाराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोहम लखन कसबे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, घरासमोर सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेल्या, परंतु उघड्या सोडलेल्या खड्ड्यात पडून सोहमचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार मोठे खड्डे खोदण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे खड्डे पाण्याने पूर्णपणे भरले होते. त्यामुळे ते किती खोल आहेत हे वरून दिसणे कठीण झाले होते.
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा...
परिसरात विकासकामांसाठी खड्डे खोदले असताना त्याभोवती कोणतेही बॅरिकेड्स, संरक्षक जाळी, दोरी किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आले नव्हते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुरक्षेचे हे मूलभूत नियम पाळणे बंधनकारक असताना कंत्राटदाराने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ज्या एजन्सीने हे काम घेतले होते आणि सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन का केले, याचा शोध पोलीस घेत आहेत. दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
... आणि मृतदेह वर आला
सोहम आपल्या घराबाहेर गुरुवारी दुपारी खेळत असताना अचानक या उघड्या खड्ड्याजवळ गेला आणि त्यात पडला. सोहमची आई शिल्पा कसबे यावेळी घरात स्वयंपाक करत होत्या. काही वेळाने मुलगा दिसेनासा झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शेवटी घराशेजारील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात काठी टाकून पाहिले असता सोहमचा मृतदेह वर तरंगताना आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.