Pune : आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण १३ व्या दिवशीही तीव्र; आंदोलकाची प्रकृती चिंताजनक, राहुल गांधींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील मांजरी येथे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले असून उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे.
Pune : आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण १३ व्या दिवशीही तीव्र; आंदोलकाची प्रकृती चिंताजनक, राहुल गांधींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Pune : आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण १३ व्या दिवशीही तीव्र; आंदोलकाची प्रकृती चिंताजनक, राहुल गांधींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र(Photo-X)
Published on

पुणे : पुण्यातील मांजरी येथे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले असून उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीची दखल घेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संवेदनशील प्रकरणात स्वतः पुढाकार घेण्याची आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्वरित तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली आहे तर दुसरीकडे मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईवर हल्लाबोल करण्याचा आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा आंदोलक संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे.

प्रदीर्घ उपोषणामुळे दोन ते तीन विद्यार्थ्यांना उपोषणस्थळीच चक्कर आल्याने व प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यापैकी यश पावरा नावाच्या विद्यार्थ्याची प्रकृती कमालीची बिघडल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले तर दुसऱ्या बाजूला 'दासवे' नावाच्या एका आंदोलक विद्यार्थ्याने डॉक्टरांनी गंभीर परिस्थितीचा इशारा दिला असतानाही रुग्णालयात दाखल होण्यास स्पष्ट नकार दिला. अत्यंत बिकट परिस्थितीतही, 'पुन्हा चक्कर येऊ शकते किंवा प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते, तरीही मी स्वतःच्या जबाबदारीवर उपोषण सुरू ठेवत आहे,' असा लेखी संमती फॉर्म (कन्सेंट फॉर्म) लिहून देत हा विद्यार्थी आपल्या उपोषणावर ठाम राहिला आहे.

सामूहिक आत्मदहनाचा इशारा

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी 'आमच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका; जर आमच्या भावाला किंवा बहिणीला काही झाले, तर त्याला हे भाजप सरकार, आदिवासी विकास विभाग आणि मुख्यमंत्रीच जबाबदार असतील,' अशी तीव्र प्रतिक्रिया देत मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईवर हल्लाबोल करण्याचा आणि सामूहिक आत्मदहनाचा इशाराही संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे.

शब्दांचा खेळ करू नका!

आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाची अट रद्द किंवा शिथिल करण्याबाबत तोंडी घोषणा केली असली, तरी आंदोलक विद्यार्थ्यांनी ती पूर्णपणे फेटाळून लावली आहे. शासनाकडून केवळ 'शब्दांचा खेळ' केला जात असून अट 'रद्द' करण्याऐवजी 'शिथिल' किंवा तात्पुरती स्थगित करण्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in