

पुणे : एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नारायण पेठ परिसरात घडली. तर कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये २१ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडल्याने खळबळ उडाली आहे.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे नाव प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे आहे. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले असून, आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. तर एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचे नाव माया शेखर रेड्डी (वय २१, रा. हैदराबाद) असे असून ती भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, सध्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षेच्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज तिच्या भावाने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.
प्रथमेश हा मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. पुण्यात राहून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. मात्र, काही काळापासून तो आर्थिक अडचणीत होता. त्याने काही व्यक्तींकडून पैसे उधार घेतले होते. कर्जाची परतफेड करणे आणि पुण्यातील राहणीमानाचा खर्च भागवणे त्याला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे पुणे सोडून गावी जाण्याचा विचारही त्याने केला होता. त्याच्या खोलीचे भाडेदेखील थकले होते. दरम्यान, प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. याचिठ्ठीत आर्थिक अडचणी आणि त्याच्याकडून पैसे घेतलेल्या काही व्यक्तींच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी नारायण पेठ पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. प्रथमेशवर नेमके किती कर्ज होते, त्याने कोणाकडून पैसे घेतले होते आणि आत्महत्येमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. सुसाईड नोटमधील उल्लेखांच्या आधारे संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कात्रज येथील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये एका महिलेने दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे २० ते २५ वयोगटातील एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. तिच्या शरीरातून रक्तस्राव होत आसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याठिकाणी उपस्थित असलेल्या तिच्या भावाने ती आपली बहीण असल्याचे सांगत तिचे नाव माया शेखर रेड्डी सांगितले. ती नॅन्सी लेक होम सोसायटीतील फ्लॅटमध्ये भावासोबत राहत होती. तिचे कुटुंबीय मूळचे हैदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावाची पोलिसांनी चौकशी केली असता, माया हिचे कोणाशीही भांडण अथवा वाद झाल्याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले. सध्या तिच्या परीक्षा सुरू असल्याने अभ्यास आणि परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असावी, असा संशय त्याने व्यक्त केला. तसेच या घटनेबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.