

पुणे : पुण्यात कुत्र्यांच्या झुंडीने सोमवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात शोभा वाघमारे (३२) या महिलेचा मृत्यू झाला आहे. वाघमारे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर आढळल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. ही घटना शहराच्या चाकण भागात पहाटे २:१५ च्या सुमारास घडली आणि ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
शोभा वाघमारे रस्त्यावरून जात असताना पहिल्यांदा एक-दोन कुत्रे तिच्या दिशेने धावून आले. तेव्हा त्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. अवघ्या काही सेकंदातच, सहा ते सात कुत्र्यांनी तिला पूर्णपणे घेरले आणि तिला ओरबडायला सुरुवात केली. तिने स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, तिला यश आले नाही. त्या महिलेची पांढरी साडी रक्ताने लाल झाली. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरुवातीला पोलिसांना हा खुनाचा प्रकार असावा असा संशय होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर, कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी दुजोरा दिला.