

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भगिनी कीर्ती फाटक यांनी पुणे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या, आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या महिला म्हणून नाही, तर पुण्यातल्या महिला म्हणून स्वतःला असुरक्षित महिला समजत आहोत.कारण नुकतीच नसरापूरची जी घटना घडली आहे त्यासंबंधात मी पोलीस आयुक्तांना भेटायला आले होते.
त्यांनी आम्हाला आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पुण्यात पूर्वी असे नव्हते. महिला एवढ्या असुरक्षित नव्हत्या. आता रोज काहीतरी घडत आहे. मोठ्या वयाची बाई असेल किंवा लहान मुलगी असेल सगळ्यांना कुठेही सुरक्षित वाटत नाही. कायद्याचे भय राहिलेले नाही. आधी गुन्हे केलेले असले तरी तो आरोपी राजरोसपणे बाहेर फिरत आहे. पुन्हा नवीन गुन्हा करायला मोकळा. हे कुठेतरी थांबायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
रस्त्यावर फिरणारी सुरक्षा पथके वाढवावीत
पुढे बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या, आम्हाला सुरक्षित जगायचे आहे आणि ही जबाबदारी पोलीस आयुक्तांची आहे. आणि तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडण्यासाठी काय उपाययोजना करत आहात? हे आत्ता आम्ही त्यांना विचारले. त्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की दामिनी पथक आहे, सुरक्षा दीदी आहे, ११२ नंबर डायल केला की लगेच मदत मिळते. मी म्हटले की अहो साहेब ती मदत मिळेपर्यंत घटना घडून गेलेली असते. त्याच्यावर ठोस उपाययोजना पाहिजे. तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ व्हायला पाहिजे. सध्या पोलीस स्टेशन वाढले आहेत, पण रस्त्यावर फिरणारी सुरक्षा पथके वाढली पाहिजेत आणि त्यात महिला वाढल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे.
गृहमंत्र्यांनी कानावर ठेवले असतील हात...
गृहमंत्री अपयशी ठरले का? असे विचारले असता कीर्ती फाटक म्हणाल्या, गृहमंत्री अपयशी ठरले आहेत हे वाक्यच आता मला बोलावे वाटत नाही. म्हणजे मला आता त्यावर बोलावे असे वाटतच नाही. किती निदर्शने करायची, किती मोर्चे काढायचे, किती आरडाओरडा करायचा, त्याच्यावर कुठे काय होत आहे? कारण गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले असतील, डोळ्यावर हात ठेवले असतील तर आपण बोलून, आपण ओरडून काहीच होणार नाही. त्यामुळे मला त्यांना काहीच बोलायचे नाही. आता लोकच बघत आहेत, तेच आता त्यांचे मत ठरवत आहेत.
सध्याच्या विकृती वाढण्यामागे सोशल मीडिया
कीर्ती फाटक म्हणाल्या, सगळीकडे सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. सध्याच्या विकृती वाढण्यामागे सोशल मीडिया आहे. आपण आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी कोणापासून सावध राहिले पाहिजे, आपले मुल सुद्धा कसे वागावे हे आपण घरीच प्रशिक्षण दिले पाहिजे. आपल्या घरात सुद्धा कोणी विकृत वागत नाही ना हे देखील आपण पाहिले पाहिजे.