

पुण्यातील येरवडा परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोकळ्या आवारात सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभी असलेली ५० हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने जळून खाक झाली.
१५ ते २० चारचाकी, ४० ते ५० दुचाकी जळून खाक
माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली. कार्यालयाच्या मैदानात पार्क केलेल्या वाहनांमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. एकापाठोपाठ एक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि आकाशात दाट धुराचे लोट पसरले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीत अंदाजे १५ ते २० चारचाकी आणि ४० ते ५० दुचाकी जळून खाक झाल्या.
आगीचं कारण काय?
घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी वेगाने कारवाई करत आग नियंत्रणात आणली आणि जवळील इमारती तसेच शासकीय कार्यालयांपर्यंत ज्वाळा पसरण्यापासून रोखल्या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, "दुपारी सुमारे १२.३० वाजता आगीची माहिती मिळाली. तात्काळ चार गाड्या रवाना करण्यात आल्या. आमच्या पथकाने वेळेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला." येरवडा विभागाचे अग्निशमन अधिकारी सोपान पवार यांनी 'द फ्री प्रेस जर्नल'शी बोलताना सांगितले की, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, घटनास्थळी कचऱ्याचा ढीग आढळून आला आहे आणि जळत्या सिगारेटच्या थोटकामुळे आग लागली असावी असा संशय आहे.
जळालेली वाहने कोणाची?
धक्कादायक म्हणजे, जळालेल्या वाहनांची मालकी अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ही वाहने त्यांची नाहीत आणि कोणतीही खाजगी कंपनी किंवा व्यक्ती मालकीचा दावा करण्यासाठी पुढे आलेली नाही.
सुदैवाने जीवितहानी नाही
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकाऱ्यांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे.