

पुणे : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सवलती आणि आर्थिक लाभ मिळविल्याच्या आरोपांप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाच शिक्षकांना निलंबित केले असून, अन्य ४१ शिक्षकांचे आर्थिक लाभ रद्द करून त्यांच्याकडून यापूर्वी मिळालेले लाभ वसूल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे विविध शासकीय सवलती आणि लाभ मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने संशयित शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय पुनर्तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत सुमारे ४५० शिक्षकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४६ शिक्षकांचे दिव्यांगत्व शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले.
यापैकी पाच शिक्षकांचे दिव्यांगत्व केवळ शून्य ते १० टक्क्यांदरम्यान आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यामध्ये शिरूर तालुक्यातील तांदळी येथील कोमल शिरसाट, खेड तालुक्यातील मुडकेवाडी येथील अरुणा तांबे, आंबेगाव तालुक्यातील दस्तूरवाडी येथील मधुकर ठोंगिरे आणि शिंगवे येथील सुभाष इंदोरे तसेच हवेली तालुक्यातील वडकी नाला येथील वाजेदा शेख यांचा समावेश आहे.