शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ९७ लाखांची फसवणूक; चार आरोपी अटकेत; ४०० हून अधिक व्हिलांमध्ये शोधमोहीम

लोणावळा परिसरातील व्हिला व गेस्ट हाऊसमध्ये थांबून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ९७ लाखांची फसवणूक;  चार आरोपी अटकेत; ४०० हून अधिक व्हिलांमध्ये शोधमोहीम
Published on

पुणे : लोणावळा परिसरातील व्हिला व गेस्ट हाऊसमध्ये थांबून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोनिल अतुलकुमार मोदी (२४), रवी गोकल प्रसाद जाट (२१), रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (२२) आणि हंश कैलास वर्मा (१९) अशी आहेत. या प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, फसवणुकीतील १८ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. तपासात आरोपींनी येस बँकेतील एका करंट अकाऊंटमध्ये ८ लाख २५ हजार रुपये जमा करून घेतल्याचे उघड झाले. संबंधित खाते ‘वेल्टोरा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने उघडण्यात आले होते. या खात्याचा धारक मोनिल मोदी हा सतत वेगवेगळ्या राज्यांत फिरत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

दरम्यान, आरोपी लोणावळ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले.

लोणावळा परिसरात शोधमोहीम सुरू

लोणावळा परिसरातील सुमारे ४०० ते ५०० व्हिलांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत आणखी तीन जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप, ७ मोबाईल फोन, १४ डेबिट कार्ड, वेब कॅमेरे, बँक अकाऊंट किट आणि रबरी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त केला.

खात्यात एक कोटींहून अधिक रक्कम

तपासादरम्यान आरोपी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात सायबर फसवणुकीची रक्कम वर्ग करत असल्याचे समोर आले. या खात्यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचेही उघड झाले आहे. आरोपींनी विविध बँकांमध्ये अनेक करंट अकाऊंट उघडून देशभरात अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. या टोळीवर हाँगकाँगमधून वेब कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना यूएसडीटी (USDT) क्रिप्टोकरन्सीद्वारे मोबदला दिला जात होता. सर्व आरोपी सुशिक्षित असून त्यांना बनावट नोकरीचे आमिष दाखवून या गुन्ह्यात ओढले गेले असल्याचेही समोर आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in