पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी

पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला चीतपट करत यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.
पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी
एक्स @ParagShahBJP
Published on

अहिल्यानगर : पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला चीतपट करत यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. पैलवान शिवराज राक्षे याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट पंचांनाच लाथ मारल्याने अहिल्यानगर येथे रविवारी झालेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे गालबोट लागले. मात्र, अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर एकच जल्लोष केला.

अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळने सुरुवातीला एक गुण जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्र गायकवाड यानेही एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी साधली. पृथ्वीराजने पुन्हा एकदा गुण मिळवल्यानंतर चाहत्यांनी गोंधळ घातला. सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केले. याच प्रयत्नात महेंद्र गायकवाडने मैदान सोडले आणि अखेर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराजला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.

पृथ्वीराजने आपल्या वडिलांना खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी, डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पंचांची कॉलर पकडली आणि लाथही मारली.

logo
marathi.freepressjournal.in