
सत्तेमधून पायउतार झाल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने बैठकांचे सत्र सुरु केले आहे, तर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करुन महाराष्ट्रभर जनतेशी आणि पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मात्र हे सर्व चालू असताना पक्षादेश झुगारून कार्य करणाऱ्या सेनेतील लोकांची हकालपट्टी देखील रोज होत आहेत. प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर आता शिवसेनेने त्यांच्या मुलावर कारवाई केली आहे. त्यांच्यासह सहसचिव किरण साळी यांची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत. त्यांच्याकडे युवा सेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पूर्वेशची पत्नी परिषा सरनाईक या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. ते प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले तेव्हा त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांचीही या प्रकरणात नावे होती. विहंग ग्रुप ऑफ कंपनीजमधील गैरव्यवहारप्रकरणी ही तपासणी करण्यात आली.