
जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकातून जळगावकडे येत असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ, मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्पर कारवाई यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, बोगी क्रमांक ४ मधील स्लीपर डब्याच्या चाकाजवळ धूर उठल्याचे पाहून प्रवाशांनी तातडीने ओरडून इतरांना सावध केले. तत्पूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. प्राथमिक तपासणीत असे स्पष्ट झाले की, स्लीपर बोगीच्या चाकाचा ब्रेक लायनर घासल्याने स्पार्क निर्माण झाला आणि त्यातून आग लागली. रेल्वे तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गाडी सुरक्षिततेची खात्री करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या कारणास्तव पुष्पक एक्स्प्रेस सुमारे २०-२५ मिनिटे भादली रेल्वे स्थानकाजवळ थांबली, मात्र प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्वांनी दिलासा अनुभवला. गाडीचे तांत्रिक तपासणीनंतर पुष्पक एक्स्प्रेस पुढील प्रवासाला सुरळीतपणे रवाना झाली.