
आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपूर जिल्ह्यातील दोघा तरुण भाविकांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका घटनेत एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येत असताना कर्नाटकातील दोघा भाविकांचा अपघाती मृत्यू झाला.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील तिघे मित्र आषाढीसाठी रेल्वेने पंढरपूरला आले होते. आल्यानंतर त्यांनी चंद्रभागेत स्नान करून दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला व तिघे जण चंद्रभागा नदीवर स्नानासाठी पोहोचले. यातील दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. सचिन शिवाजी कुंभारे (वय २८, रा. जलाखेडा, नागपूर) आणि विजय सिद्धार्थ सरदार (वय २७, रा. नारसिंगी, जि. नागपूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. सचिन कुंभारे हा नदीपात्रात अंघोळीसाठी उतरला होता. पाणी जास्त असल्यामुळे त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला आणि त्याला वाचवण्यासाठी विजयने पाण्यात उडी घेतली. त्यालाही पोहता येत नसल्यामुळे तोही पाण्यात बुडू लागला.
दुसऱ्या एका घटनेत पंढरपूर-सांगोला मार्गावरील कासेगाव फाटा वनीकरणाजवळ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या पाईपला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन वारकरी जागीच ठार झाले. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमींना पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. राजू संभाजी शिधोळकर व परशुराम संभाजी जवरुचे दोघे रा. अनगूळ, जि. बेळगाव अशी मृतांची नावे आहेत. तर अभिजीत उंबरे व गीतेश पोकशेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मयत आणि जखमी हे सर्वजण आषाढी एकादशीनिमित्त चारचाकी गाडीतून बेळगावहून पंढरपूरकडे येत होते.