गृहप्रकल्पांना क्यूआर कोड बंधनकारक ; ग्राहकांना मिळणार एका क्लिकवर कोणत्याही प्रकल्पाची माहिती

मार्च अखेरीपासून आमच्याकडे नोंदणी झालेल्या सर्व गृहप्रकल्पांचा क्यूआर कोड आहे, असे महारेरा अधिकाऱ्याने सांगितले
गृहप्रकल्पांना क्यूआर कोड बंधनकारक ; ग्राहकांना मिळणार एका क्लिकवर कोणत्याही प्रकल्पाची माहिती

येत्या १ ऑगस्टपासून राज्यातील अलीकडेच नोंदणी झालेले असोत वा भविष्यात नोंदणी होणारे असोत सर्व गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांकासोबत क्यूआर कोड (क्वीक रिस्पॅान्स कोड) जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे गृह खरेदीदार ग्राहकांना एका क्लिकमध्ये प्रकल्पाबाबतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. मार्च अखेरीपासून आमच्याकडे नोंदणी झालेल्या सर्व गृहप्रकल्पांचा क्यूआर कोड आहे, असे महारेरा अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तसेच महारेराने आपल्याकडे नोंदणी झालेल्या जुन्या गृहप्रकल्पांना देखील क्यूआर कोड पुरवले आहेत. तेव्हा सर्व विकासकांनी हे क्यूआर कोड महारेरा नोंदणी क्रमांकाच्या बाजुला प्रसिद्ध करायचे आहेत. याचा अर्थ गृहप्रकल्पांच्या सर्व जाहिराती आणि मार्केटिंग संबंधित जाहीर तपशिलात क्यूआर कोड देणे बंधनकारक आहे. गृह खरेदीदारांना गृहप्रकल्पांविषयीची सर्व माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी महारेराने हे पाऊल उचलले आहे. अनेक प्रकरणांमध्ये साधेभोळे ग्राहक विकासकांनी केलेले दावे तपासून न पाहता आपल्या आयुष्यभराची पुंजी त्यांना देऊन बसतात. नंतर कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहतात. आता प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन असतो. तेव्हा क्यूआर कोड स्कॅन करून ते त्वरित प्रकल्पाची माहिती तपासून पाहू शकतील. अन्यथा लोक पडताळणी करायचे राहून जातात, नाहीतर रेरा नोंदणी क्रमांक तरी विसरतात. क्यूआर कोडमुळे या दोन्ही समस्यांवर उपाय मिळाला आहे. महारेराच्या पोर्टलवर प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्पपूर्तीची तारीख, मंजूर प्लॅनमध्ये करण्यात आलेले बदल, प्रकल्पाविषयीच्या तक्रारी, मंजूर प्लॅन, एकूण पार्किंग जागा, प्रकल्प नोंदणी नूतनीकरण इत्यादी तपशीलवार माहिती देण्यात आलेली असते. प्रत्येक तीन महिन्यांनंतर विकासकाने प्रकल्पाबाबतची ताजी माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून हे देखील तपासून पाहता येईल.

logo
marathi.freepressjournal.in