अलौकिक माथेरान! निसर्गाचा वरदहस्त लाभलेले ठिकाण सहलीसाठी बेस्ट

माथेरानची राणी म्हणजे इथली ‘टॉय ट्रेन’ हे या पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे
अलौकिक माथेरान! निसर्गाचा वरदहस्त लाभलेले ठिकाण सहलीसाठी बेस्ट

चंद्रकांत सुतार

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. १८५० साली ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी उंच डोंगराच्या कुशीत वसलेल्या माथेरानचा शोध लावला. मुंबईपासून अवघ्या ९० तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे पर्यटकांच्या सर्वोत्तम पसंतीचे ठरले आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या नेरळ रेल्वे स्टेशनलगत हे पर्यटनस्थळ असून माथेरानला येण्यासाठी टॉय ट्रेनची सुविधासुद्धा आहे. माथेरानची राणी म्हणजे इथली ‘टॉय ट्रेन’ हे या पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे.

सर आदमजी पिरोभॉय यांनी १९०७ साली टॉय ट्रेन स्वखर्चाने सुरू केली. नेरळ ते माथेरान या २२ किलोमीटर अंतरावर रेल्वे मार्गात जुमापट्टी, वॉटर पाईप आणि अमन लॉज हे थांबे आहेत. नेरळहून सुटलेल्या टॉय ट्रेनला माथेरानमध्ये पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. पण हा प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय आनंदच असतो. कधी गर्द झाडीतून तर कधी डोंगराच्या कडेकपारीतून वाट काढत ही टॉय ट्रेन माथेरान स्टेशनवर कधी येऊन थांबते, हे कळतदेखील नाही. नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेन सेवा पावसाळ्यात बंद असते. मात्र अमन लॉज ते माथेरान ही शटलसेवा वर्षभर सुरू असते.

टॉय ट्रेन प्रमाणेच माथेरानला येण्यासाठी घाटवळणाच्या रस्त्याचाही पर्याय तुम्हाला निवडता येईल. नेरळ ते माथेरान या मार्गावर खासगी टॅक्सीप्रमाणे मिनी बससेवा चालवली जाते. रस्त्याने माथेरानला येणार असाल तर दस्तुरीपर्यंत तुम्हाला आपले वाहन आणता येईल. कारण दस्तुरीच्या पुढे कोणत्याही प्रकारे वाहन नेण्यावर बंदी आहे. तुम्ही दस्तुरीला पोहोचलात की पुढे माथेरानला जाण्यासाठी पायी, घोडेस्वारी, हात रिक्षा किंवा शटल ट्रेन या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय तुम्हाला निवडता येईल. तुम्ही माथेरान मध्ये पोहोचलात की विविध हॉटेल्स, रिसॉर्ट आणि लॉज तुमच्या सेवेला हजर असतात. पर्यटकांसाठी इथे सर्वप्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध आहेत. समुद्रसपाटीपासून जवळपास २६०० फूट उंचीवर डोंगराच्या कुशीत हे सुंदर पर्यटनस्थळ वसले आहे. इथले तापमान १६ ते ३२ सेल्सिअस अंशापर्यंत असते.

माथेरान म्हणजे जणू निसर्गाने आपला सगळा खजिनाच रिता केला आहे, असा भास झाल्याशिवाय राहवत नाही. निसर्गाचं हे अलौकिक रूप केवळ माथेरानमध्ये पाहायला मिळते, म्हणूनच देशातील कोणत्याही हिल स्टेशनपेक्षा माथेरान निश्चितच वेगळं आहे. घनदाट जंगल आणि विविध वनस्पतींनी वेढलेल्या माथेरानमध्ये एकूण ३८ प्रेक्षणीय स्थळे आहेत. सध्या पावसाळ्यात लाल मातीच्या रस्त्यांवरून पायी चालणे हा वेगळाच आनंद असतो. इथे २७ जिवंत पाण्याचे झरे आहेत, त्यापैकी मेलेट स्प्रिंग, हरिस स्प्रिंग, वॉकर टँक हे झरे प्रसिद्ध आहेत. हे सगळे प्रेक्षणीय पॉईंट तुम्हाला पायी घोड्यावरून किंवा हातरिक्षामधून फिरून पाहता येतील. तुम्हाला घोडेस्वारीचा छंद असेल तर माथेरान हे त्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. येथे वाहनांना बंदी असल्यामुळे वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जातो. माथेरानच्या जंगल सफारीसाठी घोडेस्वारी हा एक उत्तम पर्याय आहे. इथल्या ओलंपिया रेस कोर्स मैदानावर दरवर्षी घोड्यांच्या शर्यती होतात. हाताने ओढणाऱ्या रिक्षा हे माथेरानचे एक आणखी एक वैशिष्ट्य आहे.

माथेरानला जसे नैसर्गिक वैभव लाभले तसा ऐतिहासिक वारसाही लाभला आहे टूरपेटीत, रेडी मनी, गुलिस्तान क्रेगिबन, एलफिस्टंट, रॉबिन्सन बार, हाऊसव्हरांडा इन द फॉरेस्ट, रग्बी गार्डन या हेरिटेज वस्तू माथेरानच्या सौंदर्यात भर घालतात. माथेरान हे पर्यटनस्थळ ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे वसले असल्यामुळे इथल्या जुन्या बांधकामावर ब्रिटिशशैलीचा प्रभाव जाणवतो. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर माथेरानच्या मार्केटमध्ये एकदा फेरफटका मारायला हवा. ब्रिटिशानी त्या काळात येथे स्वतंत्र मार्केट उभारले होते. आजही त्या मार्केटच्या आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी लोक भाजीपाला तसेच जंगली फळे, फुले विक्रीसाठी घेऊन येतात. या मार्केटमध्ये तुम्हाला इतर कुठेही न मिळणारी चिक्की मिळेल. इथला चर्मोद्योग प्रसिद्ध आहे.

माथेरानचे सौंदर्य केवळ विविध पॉईंटवरच नाही तर इथल्या जंगलातही आहे. सकाळी उठून जंगलात जरी भटकायला निघाला तरी एक वेगळे विश्व अनुभवता येते. येथील उद्यानेही डोळ्यात भरणारी आहेत. पेमास्टर पार्क, एन लॉर्ड गार्डन, छत्रपती शिवाजी उद्यान पर्यटकांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.

१०० वर्षे जुने वाचनालय, पोस्ट ऑफिस

माथेरानमध्ये शंभर वर्ष जुने वाचनालय, पोस्ट ऑफिस असून महत्त्वाचे म्हणजे माथेरानमध्ये गुन्ह्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. येथील निसर्ग आजही प्रदूषणापासून खूप दूर आहे. इथली वृक्षवल्ली अगदी वेगळी असून दुर्मिळ वनस्पती, विविध पक्षी आणि प्राण्यांचे हे माहेरघर आहे. दुर्मिळ होत चाललेला शेकरू प्राणी इथे पाहायला मिळतो. तसेच बुलबुल, पावश्या, कुट्रूक पक्षी, विविध जातीचे सर्प याच परिसरात पाहायला मिळतात.

कसे जाल?

रस्तामार्ग : माथेराने रायगड जिल्ह्यात असून मुंबई पुणे महामार्गावरून चौक-कर्जत-नेरळमार्गे माथेरानला जाता येते. नेरळ माथेरान हा नऊ किलोमीटरचा अवघड वळणाचा घाटरस्ता आहे. तसेच नेरळ रेल्वे स्थानकावरून २४ तास टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

जवळचे रेल्वे स्थानक: रेल्वेने येणाऱ्यांसाठी नेरळ हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. इथूनच माथेरानला जाण्यासाठी मिनिट्रेन सुटते.

निवास व्यवस्था : माथेरान ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट असून याशिवाय पर्यटकांना थ्री स्टार तसेच परवडणारे अनेक हॉटेल्स, लॉज येथे उपलब्ध आहेत.

वाहतूक व्यवस्था : माथेरानमध्ये मोटरवाहनांना बंदी असल्यामुळे घोडा, हातरिक्षा ही वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत.

logo
marathi.freepressjournal.in